
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या क्रिकेटच्या लीगला उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर भारतामध्ये कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, खो-खो या खेळांच्या लीगचा श्रीगणेशा करण्यात आला. कोट्यवधी रुपयांमध्ये खेळणाऱ्या आयपीएलएवढा उदंड प्रतिसाद इतर लीगला मिळाला नाही; पण आर्थिक बाबींमध्ये मागे असलेल्या इतर खेळांना व त्यामधील खेळाडूंना या लीगचा फायदा झाला. आता या वर्षअखेरपर्यंत नेमबाजी व तिरंदाजी या दोन खेळांच्या लीगला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील खेळ व त्यांच्या लीगवर
टाकलेला दृष्टिक्षेप...
फुटबॉल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळ... कमी वेळेमध्ये अनलिमिटेड रोमांच असो किंवा कोट्यवधींची उलाढाल. सर्वच बाबतीत फुटबॉल वरच्या स्तरावरच. यामुळेच या खेळाच्या लीगला जगभरातून दणदणीत प्रतिसाद लाभतो. इंग्लंडमधील प्रीमियर लीग, जर्मनीमधील बुंडेस लीगा, स्पेनमधील ला लीगा, फ्रान्समधील लीग वन आणि इटलीमधील सीरी ए या लीग सर्वोत्तम मानल्या जातात. चॅम्पियन्स लीग ही फुटबॉलमधील सर्वोच्च शिखर असलेली लीग. युरोप खंडातील देशांमधील सर्वोत्तम क्लब या स्पर्धेच्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावतात. फुटबॉल या खेळाच्या आंतरराष्ट्रीय लढतींपेक्षा लीगच्या लढतींना मोठा प्रतिसाद लाभतो. युरो, विश्वकरंडक, कोपा यांसारख्या स्पर्धांतील लढती ब्लॉकब्लस्टर ठरतात; पण या स्पर्धा मोठ्या कालावधीनंतर होतात. त्यामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमी लीगमधील लढती आवर्जून पाहतात.