
India Pakistan Cricket Rivalry
Respect in sports
प्रसंग मोठा बोलका आणि भावनिक होता. २०२५ साली फ्रेंच ओपन खुली महिलांची स्पर्धा जिंकणारी अमेरिकेची खेळाडू कोको गॉफ जपानच्या नाओमी ओसाकाबरोबर अमेरिकन खुल्या स्पर्धेतील चौथ्या फेरीचा सामना खेळत होती. नुकतीच मोठी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्याने मायदेशात खेळताना अपेक्षांचे ओझे कोको गॉफला सतावत होते. त्यातून नाओमी ओसाका जबरदस्त टेनिस खेळत होती. सामन्यामध्ये ओसाकाचा खेळ इतका भन्नाट झाला की तिने कोको गॉफला दोनच सेटमध्ये सहज पराभूत केले. तो पराभव पचवणे कोको गॉफला प्रचंड कठीण गेले. सामन्यानंतर ती निराश होऊन बसली होती आणि डोळ्यातून घळाघळा पाणी येत होते.
सामन्यात विजयी झालेल्या खेळाडूची कोर्टवरती मुलाखत घेतली जाते, तशी नाओमी ओसाकाची घेतली जाणार होती. इतक्यात ओसाका कोको गॉफकडे गेली आणि अगदी मोठ्या बहिणीच्या मायेने तिला ‘बरी आहेस का’ विचारले. आणि परत जाऊन खोलीत एकटी बसून रडण्यापेक्षा ‘इथे रड. तू काहीही चूक केलेली नाहीस, तू एक उत्तम खेळाडू आहेस. इथे बोलून मोकळी हो. खेळापेक्षा जीवन मोठे आहे,’ असे सांगत नंतर तिला चक्क तिच्यासोबत मुलाखतीसाठी बोलायला घेऊन गेली. स्वत: महान खेळाडू बनून नंतर नाओमी ओसाकाला निराशेचे झटके येत होते. खेळाडू काय मनोवस्थेतून जात असतो, याची तिला कल्पना होती. म्हणून तिने अगदी मायेने कोको गॉफला आधार देण्याचा केलेला प्रयत्न सगळ्यांना खूप भावला होता. सर्वोच्च स्तरावर खेळ चालू असताना जी टोकाची स्पर्धात्मक भावना एकप्रकारची खुन्नस असते, त्याला छेदून ओसाकाने विचार केला हे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून खेळाडू आणि माणूस म्हणून नाओमी ओसाकाबद्दल आदर वाटतो, जो तिने कमावला आहे.