क्रिकेटमध्ये पुन्हा येतंय गोलंदाजांचं राज्य? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket }

क्रिकेटमध्ये पुन्हा येतंय गोलंदाजांचं राज्य?

sakal_logo
By
सुधीर काकडे

गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटची ओळख 'फलंदाजांचा खेळ' अशीच झाली आहे. पाटा खेळपट्ट्यांचा फायदा घेऊन मनसोक्त फटकेबाजी करणारे फलंदाज आणि ते सहन करणारे हतबल गोलंदाज, हे चित्र नित्याचंच. बरेचसे नियमही यात फलंदाजांच्याच बाजूचे. परंतु हे चित्र बदलत असल्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. फलंदाजांचे कमकुवत झालेले तंत्र, गोलंदाजांनी केलेले परिस्थितीनुरूप बदल यांमुळे गोलंदाज पुन्हा वर्चस्व गाजवू लागले आहेत. मात्र हेच वास्तव आहे का? हे चित्र कायम राहणार का? हा बदल खेळावर दूरगामी परिणाम करणार का?, अशा विविध प्रश्नांचा धांडोळा घेणारा हा लेख.

स्टेडियमबाहेर जाणारे गगनचुंबी षटकार, दोनशेच्या स्ट्राईक रेटने धावा काढणारे फलंदाज आणि आपलीच धुलाई हताशपणे बघणारे गोलंदाज. गेल्या काही वर्षांत क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात हमखास दिसणारं हे चित्र. २००३ साली टी-ट्वेन्टी क्रिकेटच्या आगमन झाल्यानंतर फलंदाजांनी जो धुमाकूळ घालायला सुरुवात केली, तो अद्याप सुरूच आहे. टी-ट्वेन्टीत २०० धावा, वनडेत ३५० धावा अगदी सहज निघू लागल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही तेच तंत्र वापरून फलंदाज २५ चेंडूत ५० धावा काढू लागले आहेत. या सगळ्या परिस्थितीला अत्याधुनिक बॅट्स, लहान मैदाने आणि सपाट खेळपट्टीची साथ मिळत आहे. त्यामुळे खोऱ्याने धावा काढणे म्हणजेच चांगला खेळ करणे, असा एक समज नव्याने क्रिकेटकडे वळणाऱ्या खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचाही झाला आहे.

मात्र गेल्या दोन वर्षांत हे चित्र बदलत असल्याची चिन्हे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २५० धावांचा टप्पा गाठतांनाही आता संघांची दमछाक होत आहे. कमी धावसंख्येचे सामने झाल्याने दोन-अडीच दिवसांतही कसोटी सामने संपू लागले आहेत. १०० धावांच्या आत संघाचा डाव आटोपणे, हे अनेक वेळा घडू लागले आहे. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्येही १५० धावा पुरेशा वाटू लागल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आयपीएलसारख्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये देखील कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळत आहेत. एरवी फारसा प्रसिद्धी झोत न मिळणारे गोलंदाज आता पोस्टर बॉय होऊ लागले आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये पुन्हा गोलंदाजांचं राज्य येणार, हे विधान धाडसाचे वाटत असले तरी देखील अवास्तव नक्कीच नाही.

हेही वाचा: ‘लालपरी’चा गळा घोटला कुणी?

हे चित्र बदलण्याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. त्यातील सर्वांत प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांचे कमकुवत झालेले तंत्र. टी-ट्वेन्टी क्रिकेटने अनेक वरदानं दिली असली तरी फलंदाजांना आततायीपणाचा शापही त्यासह दिला आहे. ऑफस्टंपबाहेरील चेंडूंना आदर दाखवणं, चेंडू स्विंग होत असतांना 'ऑन द राईज' फटके न खेळणं अशा मूलभूत नियमांचा फलंदाजांना विसर पडला आहे. त्यामुळेच गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर आणि परिस्थितीत फलंदाजांची त्रेधातिरपीट नाही उडाली, तरच नवल.

अशीच परिस्थिती यंदाच्या आयपीएलमध्ये उद्भवली होती. संयुक्त अरब आमिरातीतील संथ खेळपट्ट्यांवर चेंडू थांबून बॅटवर येत होता. त्यामुळे १२५ सारख्या धावसंख्येचा बचाव करूनही संघ विजय मिळवत होते. मोठे फटके मारणे, ज्याला क्रिकेटच्या भाषेत स्लॉग म्हंटले जाते, ते या खेळपट्ट्यांवर सहज शक्य होत नव्हते. या परिस्थितीशी जुळवून घेतांना बहुतांश फलंदाजांना संघर्ष करावा लागला. मात्र यातील लक्षणीय बाब म्हणजे मूलभूत तंत्र पक्के असलेल्या आणि 'क्रिकेटिंग शॉट्स' खेळण्यावर भर देणाऱ्या फलंदाजांना इथे यश मिळाले. 'ऑरेंज कॅप' मिळवणारा ऋतुराज गायकवाड तसेच फॅफ ड्यू प्लेसिस, केएल राहुल या फलंदाजांनी धावांचा पाऊस पडला. याचं रहस्य त्यांच्या तंत्रशुद्ध फलंदाजीत दडलं होतं. माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्करच्या लाडक्या शब्दांत सांगायचं झालं तर 'व्ही' मध्ये म्हणजे मिडऑफ ते मिडऑन क्षेत्रांत सरळ बॅटने खेळलेल्या फटाक्यांनी त्यांना धावा मिळाल्या. आणि आडव्या बॅटने केवळ मोठे फटाके मारण्यात धन्यता मानणारे फलंदाज इथे अपयशी ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा फलंदाजीचं मूलभूत तंत्र गिरवण्याचं महत्व अधोरेखित झालं.

हीच बाब कसोटी क्रिकेटमध्ये देखील अधोरेखित झाली. ऑफस्टंम्पबाहेरील चेंडू सोडण्याची सवय नसलेले फलंदाज ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यासारख्या देशांत स्विंगला पोषक परिस्थितीत गोलंदाजांच्या तालावर नाचू लागले. भारतीय संघाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास २०२० सालच्या डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऍडलेड कसोटीत ३६ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. त्याला काही महिने उलटत नाही तोच ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत ते ७८ धावांवर सर्वबाद झाले. या दोन्ही डावांनंतर त्यातून सावरत संघाने पुन्हा चांगली कामगिरी केली, हे जरी खरे असले तरी देखील फलंदाजीचा हा 'कोलॅप्स' चिंताजनक आहे.

गोलंदाजांचं वर्चस्व वाढण्यास कारणीभूत ठरलेला दुसरं सर्वाधिक महत्वाचं कारण म्हणजे गोलंदाजांनी आपल्या तंत्रात कालानुरूप केलेल्या सुधारणा. पूर्वी खेळपट्ट्या आणि परिस्थिती, या दोन्ही गोष्टी बहुतांश वेळा गोलंदाजांच्या बाजूने असायच्या. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना स्विंग, रिव्हर्स स्विंग आणि फिरकी गोलंदाजांना पारंपरिक फिरकीसह गुगली आणि दुसरा, ही आयुधं पुरेशी होती. मात्र प्रेक्षकाभिमुख क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून पाटा म्हणजेच सपाट खेळपट्ट्या तयार होऊ लागल्या. शिवाय प्रत्येक नो बॉल वर फ्री हिट देण्याचा नियमही अस्तित्वात आला. त्यामुळे साहजिकच गोलंदाजांसमोरील आव्हानात वाढ झाली. आणि मग त्यातून नवनवीन आयुधांचा त्यांच्या भात्यात समावेश झाला. एकेकाळी सणासुदीसारखा क्वचितच दिसणारा यॉर्कर दर षटकांत टाकल्या जाऊ लागला. अलीकडे तर अगदी पॉवरप्लेमध्येही त्याचा सर्रास वापर केला जातो. त्याच्या जोडीला वाईड यॉर्कर आणि स्लोअर बॉलचा जन्म झाला. स्लोअर बॉलचेही मग नकल बॉल, बँक ऑफ द हॅन्ड बॉल असे नानाविध प्रकार पुढे आले.

हेही वाचा: कामगार संहिता : भविष्यवेधी पाऊल

फिरकी गोलंदाजही यात मागे राहिले नाहीत. टी-ट्वेन्टी आणि वनडे क्रिकेटमध्ये मधली षटके अधिक निर्णायक ठरत आहेत, हे लक्षात आल्यावर फिरकी गोलंदाजांना अधिक महत्व आले. धावा दिल्या तरी चालेल, मात्र बळी घ्यायला हवेत, अशी भूमिका फिरकीपटूंकडे आली. मग रविचंद्रन अश्विन सारख्या ऑफ स्पिनर्सनी 'दुसरा'चा वापर करतांनाच 'कॅरम बॉल' टाकण्यासही प्रारंभ केला. कुलदीप यादव, तबरेझ शम्सी अशा चायनामन फिरकीपटूंचा भाव वधारला. वरूण चक्रवर्तीसारख्या 'मिस्ट्री स्पिनर'चा उदयही याच कारणाने झाला. आता तर ऑफ स्पिनर असलेला आर. अश्विन आंतरराष्ट्रीय सामन्यातही लेगस्पिन टाकतो, हे खेळाच्या बदललेल्या स्वरूपाचेच फलित होय.

एकूणच गेल्या काही वर्षात गोलंदाज पुन्हा एकदा खेळाच्या परिघाच्या केंद्रस्थानी आले आहेत. जसप्रीत बुमराह, राशिद खानसारखे गोलंदाज एकहाती सामने जिंकवून देत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर प्रतिस्पर्ध्यांचे २० बाली घेणे, अपरिहार्य असल्याचे लक्षात आल्याने दर्जेदार गोलंदाजांचे प्रस्थ वाढले. अर्थातच त्यामुळे ते आपल्या देशाच्या आणि फ्रँचायझींच्या संघांचे 'पोस्टर बॉय' ठरत आहेत. राशिद खानला तर त्याच्या वादातीत प्रदर्शनामुळे अफगाणिस्तानचे कर्णधारपदही वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी देण्यात आले. त्यामुळे इथून पुढे गोलंदाज अधिकतम संघांचे कर्णधार होऊ लागले, तर आश्चर्य वाटायला नको.

हेही वाचा: शहाणी गुंतवणूक : माझ्या 'मनी' चे प्रश्न!

मात्र हे चित्र आशादायी दिसत असलं तरी देखील ते कायम राहील, याची शाश्वती नाही. नुकत्याच झालेल्या आयपीयएलमध्ये कमी धावसंख्येचे सामने पाहून प्रेक्षकांमधून नाराजीचा सूर उमटला. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहण्याची सवय असल्याने हे सामने कंटाळवाणे झाल्याचे मत अनेक प्रेक्षकांनी नोंदवले. फ्रँचायझी क्रिकेट प्रेक्षकाभिमुखच असल्याने ही नाराजी दूर करण्यासाठी पुढच्या हंगामात फलंदाजांना अनुकूल वातावरण दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसीसाठीही नवनवीन प्रेक्षक आकृष्ट करणे, हा अजेंड्यावरील मुख्य विषय आहे. त्यामुळे प्रेक्षकांची नाराजी त्यांनाही परवडणारी नाही. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात सामने खेळवण्याचा निर्णय, हा प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठीच घेण्यात आला होता. मात्र गुलाबी चेंडूवर फलंदाज संघर्ष करत असल्याने हे कसोटी सामने अडीच-तीन दिवसांत संपत आहेत. हे टाळण्यासाठी आयसीसी नवीन उपायांचा अवलंब करू शकते.

थोडक्यात, गोलंदाजांच्या बाजूला तराजूचे पारडे झुकत असले तरी तात्काळ दुसऱ्या बाजूला ते झुकवण्यात खेळाच्या प्रशासकांपासून ते जाहिरातदारांपर्यंत सगळेच प्रयत्न करतील. त्यामुळे क्रिकेटमध्ये गोलंदाजांचे राज्य येतंय, हे विधान अवास्तव नसले तरी त्यापुढील प्रश्नचिन्ह मात्र अद्यापही कायम आहे.

go to top