

Stock Market 2026
esakal
कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपली सहनशक्ती, प्रसंगावधान, निरीक्षणशक्ती न गमावता सारासार विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला धुरंधर म्हणतात. वर्ष २०२५ मध्ये भू-राजकीय तणाव, जागतिक आर्थिक अस्थिरता अशा कारणांमुळे जागतिक शेअर बाजारात आणि भारतीय शेअर बाजारातही तीव्र चढ-उतार झाले तरीही एका अर्थाने तोच ‘धुरंधर’ ठरला आहे आणि आगामी वर्षातही तोच ‘धुरंधर’ ठरेल, असा विश्वास आहे.
गेल्या काही वर्षांत जोरदार कामगिरी दाखविल्यानंतर, भारतीय शेअर बाजार गेल्या वर्षी ‘बॅकफूट’वर गेला. नाही म्हणायला ‘निफ्टी’ आणि ‘सेन्सेक्स’ नऊ ते दहा टक्के वाढले खरे; पण गुंतवणूकदार काही आनंदले नाहीत. अर्थात गुंतवणूकदार नेहमीच अतृप्त असतात म्हणा! त्यांच्या अपेक्षा (येथे मुद्दामच हाव, लोभ वगैरे बोचणारे शब्द वापरले नाहीत, कितीही योग्य वाटले तरी!) वाढतच असतात. ‘निफ्टी’, ‘सेन्सेक्स’ने दहा टक्के परतावा दिला असला, तरी पंटर्सच्या लाडक्या स्मॉल कॅप शेअरनी निराशा केल्यामुळे पोर्टफोलिओ अस्थिपंजरच राहिले. शेअरच्या बाहेर ज्यांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली, ते नशीबवान ठरले. ‘गोल्ड ईटीएफ’ वर्षभरात ६५ टक्के, तर चांदी १५० टक्क्यांनी वर गेली. मागील वर्षी शेअर बाजार फारसा लाभदायी ठरला नसला तरी गुंतवणूकदार अपेक्षा आणि अपेक्षाभंगाच्या हिंदोळ्यात बाजाराबरोबर लंबकासारखा झुलत होता. शेअर बाजाराला लागलेल्या ग्रहणाची अनेक कारणे गेल्या महिन्यातील लेखात उद्धृत केली होती. त्यांची पुनरुक्ती करत नाही. मात्र, गेल्या वर्षात एकूण बरेच अपेक्षाभंग झाले.