
विकसक सुपर बिल्टअपच्या नावाखाली एक हजार चौरस फुटाचे पैसे घेऊन ६०० चौरस फुटाची सदनिका ग्राहकाच्या गळ्यात मारतो. देशात सर्वत्र हाच ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे आपण किती चौरस फुटाचे पैसे दिले आणि प्रत्यक्षात आपल्याला किती चौरस फुटाचे चटई क्षेत्रफळ मिळाले हे जाणून घेण्याच्या भानगडीत तो पडत नाही. कारण विकसकाने ‘सुपर बिल्टअप’ नावाची अफूची गोळी त्यांना दिलेली असते.
एका अहवालानुसार देशभरात घर खरेदी करताना ग्राहकांवर लादले जाणारे स्पेस लोडिंग मुंबईसह एमएमआर क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ४३ टक्के आहे. मुंबईत काही ठिकाणी ते ७० टक्क्यांहून अधिक आहे. आजच्या काळात कार्पेट एरिया हेच सत्य आहे. बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया अर्धसत्य आहे. मात्र त्याचेही ग्राहकांना आज पैसे मोजावे लागतात, ही शोकांतिका आहे.