
Suvarnadurg fort
esakal
देश सुरक्षित ठेवण्यासाठी समुद्रावर सत्ता अत्यावश्यक आहे. आरमारासाठी आपले सुरक्षित सागरी दुर्ग अत्यावश्यक आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूक हेरले होते. त्यासाठी त्यांनी अनेक सागरी दुर्ग निर्माण केले. त्यांपैकीच एक म्हणजे, सुवर्णदुर्ग...
ज्या ची समुद्रावर सत्ता, त्याची देशावर सत्ता, इतके महत्त्व समुद्राचे होते... किंबहुना आजही ते कायम आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात दळणवळण हे समुद्रमार्गे चालते. शिवकाळात ज्या डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, निजाम, सिद्दी, आदिलशहा आणि मोगल या परकीय सत्तांनी भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती, त्यांनी समुद्रावर ताबा मिळविला होता. समुद्रामार्गे चालणाऱ्या व्यापार आणि वाहतुकीवर त्यांचे नियंत्रण होते. सागरी संपत्तीवर त्यांची मक्तेदारी होती. कोकणातील प्रजेवर पोर्तुगीज आणि सिद्दीकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात होते.
त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले जात होते. कोकणातील स्थानिकांना वालीच उरला नव्हता अशा काळात म्हणजे १६५६ नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे कोकणच्या मदतीला उतरले. त्यांनी सागरी संपत्ती, सागरी वाहतूक, सागरी संरक्षण आणि त्यासाठी लागणारे आरमार अन् सागरी किल्ले याचे महत्त्व ओळखले. देश सुरक्षित ठेवण्यासाठी समुद्रावर सत्ता अत्यावश्यक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. अबेसिनियावरून आलेल्या मूठभर सिद्द्यांनी कोकणवासीयांचा अमानुष असा छळ लावलेला होता. जंजिरा किल्ल्याच्या बळावर त्याने कोकणात थैमान घातले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पायबंद घालण्यासाठी सागरी दुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला.