

Ram Mandir Dharmdhwaj
esakal
आगामी काळात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची सेवा कशी असेल?
मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे, आता एका ठिकाणी वरील मजल्यावर प्रतिष्ठा करणे बाकी असून, त्यासाठी आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना बोलाविणार आहोत. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात कार्यालय, अतिथिगृह, यज्ञशाळा, वेदशाळा, आणि गोशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात पक्षांसाठी जलाशय आणि भारतीय वृक्षसंपदा असलेले छोटे अरण्य किंवा पंचवटी निर्माण करण्याचाही आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे रामसेवकांसाठी निवास व्यवस्थेचीही निर्मिती करण्यात येत आहे. भविष्यात मंदिरात सेवेसाठी येऊ इच्छिणाऱ्या रामसेवकांना येथे राहता येणार असून, येथे कशा पद्धतीने सेवा करता येईल? याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही तिथे करण्यात येणार आहे.
रामजन्मभूमी आंदोलनापासून ते राममंदिराची निर्मिती आणि आता त्यावर धर्मध्वजाची स्थापना या सर्व प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात; राममंदिराचे हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता मनात नेमक्या काय भावना आहेत?
अयोध्येतील राममंदिर हा आपल्या देशातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यासाठीही तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या अनुषंगाने १९८४ मध्ये दिल्लीमध्ये पहिली धर्मसंसद झाली, तेव्हापासून माझा या आंदोलनाशी संबंध आला आहे. त्यानंतर मी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी या आंदोलनात कधी सक्रिय, तर कधी अप्रत्यक्षपणे सहभागी होतो आणि आजही आहे. राममंदिरावर धर्मध्वज फडकविण्यात आला तेव्हा माझे तसेच अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचेही मन भरून आले होते. जे अशक्य वाटत होते, कठीण वाटत होते, ते क्रमाक्रमाने पूर्ण झाल्याचे पाहताना आणि त्या संकल्पाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत आपण पोहोचत असल्याच्या जाणीव त्यावेळी होत होती. तो ध्वज कळसाच्या दिशेने वर जात होता, तेव्हा मंदिर निर्मितीसाठी झालेला संघर्ष, त्यावेळी घडलेल्या घटना, झालेले बलिदान या सर्वांचे स्मरण होऊन आता आपण संकल्पसिद्धीपर्यंत पोहोचत आहोत याचे फार मोठे समाधान वाटत होते.
अयोध्येत राम जन्मभूमीवर रामाचे मंदिर नाही, याचे शल्य अयोध्येत दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येकाला वाटत असे, मात्र या असंतोषाला वाट मोकळी करून देण्याचे आणि त्याला आंदोलनाचे स्वरूप देण्याचे काम प्रामुख्याने विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल यांनी केले. यासाठी त्यांनी सर्व साधूसंतांना एकत्र केले.