
प्रत्येक जीव जगण्यासाठी इतरांवर अवलंबून असतो. निसर्गातील बहुसंख्य जैविक घटकांमध्ये सहजीवनाची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोन भिन्न प्रजातींमधील जवळचा आणि अनेकदा दीर्घकालीन संबंध जपत निसर्गातील जीवनचक्र अव्याहत चालूच राहते...
अगदी एकपेशीय जीवांपासून ते बुरशी, वनस्पती आणि प्राणिसृष्टीतील वैविध्यपूर्ण लहान-मोठ्या जीवांपर्यंत सर्व सजीवांची नाळ एकमेकांतील सहजीवनाशी गुंतलेली आहे. प्रत्येक जीव-प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे-जगण्यासाठी इतरांवर अवलंबून असतो. निसर्गातील बहुसंख्य जैविक घटकांमध्ये सहजीवनाची अनेक उदाहरणे आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. सहजीवन म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात राहणाऱ्या किमान दोन वेगवेगळ्या प्रजातींमधील जैविक संबंध. सहजीवनाचे तीन प्रमुख प्रकार आपल्याला दिसून येतात.
‘म्युच्युऍलिझम’ म्हणजे परस्परावलंबन, ‘कॉमेन्सॅलिझम’ म्हणजे दोन जीवांमध्ये असा संबंध ज्यात एका जीवाचा फायदा होतो, तर दुसऱ्या जीवाला कोणताही फायदा किंवा नुकसान होत नाही आणि ‘पॅरासिटिझम’ ज्याला परजीवीपणा म्हणतात. या तिन्ही सहजीवन पद्धतींची असंख्य उदाहरणे निसर्गात आढळून येतात आणि त्यातील अनेक प्रजातींच्या सहजीवनाचा कमी-अधिक परिणाम मानवावर होत असतो. वनस्पती आणि प्राणिविश्वात या सहजीवनाला त्यांच्या जगण्यास, वाढण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.