
निखिल श्रावगे
कोणत्याही स्वरूपात युद्धकुण्ड धगधगत राहिले पाहिजे, यासाठी अमेरिकी राजकारणी आणि शस्त्रउत्पादक कायम जागरूक आणि सक्रिय असतात. सीरियातील ताजे शिरकाण हेच अधोरेखित करते आहे.
सीरियातील सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी गेल्या महिन्याभरात इस्लाममधील अलवाईत उपपंथाच्या आणि ख्रिस्ती धर्माच्या सुमारे १५०० जणांची हत्या केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये माजी शासकीय अधिकारी, सैनिकांबरोबरच सामान्य नागरिक आणि महिलांचादेखील समावेश आहे. तिथे अजूनही काही प्रमाणात सुरु असलेल्या निरंकुश कत्तलीचा समाजमाध्यमांच्या साक्षीने सत्तेचा उन्माद दाखवणाऱ्या मारेकऱ्यांनी एकच हाहाकार माजवून दिला आहे. त्यांच्या या कृतीमुळे आधीच दुफळी माजलेली त्या देशातील समाजव्यवस्था आणखी बिघडेल, अशी चिन्हे आहेत. संपूर्ण पश्चिम आशियावर परिणाम करू पाहणाऱ्या या घटनेचा अन्वय लावणे त्यामुळेच आवश्यक आहे.