

Stock trading techniques
esakal
स्वाती देशपांडे - shabdapremi@gmail.com
शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस नफा मिळविण्यासाठी स्वतः अभ्यास करणे गरजेचे असते. यासाठी अनेक आधुनिक, शास्त्रशुद्ध पद्धती विकसित झाल्या आहेत. यात प्रामुख्याने फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस असे दोन प्रकार आहेत. यात टेक्निकल ॲनालिसिस या पद्धतीचा वापर करून योग्य वेळी शेअर खरेदी आणि विक्री करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळू शकते. त्याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख...
‘‘काय रियाबाई? आज एकदम खुशीत दिसताय?’’
‘‘हो गं.. बरोबर ओळखलंस. अगं झालं काय, बरेच वर्षांपासून मी एका कंपनीचे शेअर घेऊन ठेवले होते. आज त्याच शेअरना अगदी योग्य पातळीवर, चांगली किंमत मिळाली, म्हणून विकून मोकळी झाले.’’
‘‘छानच गं..!! पण काय गं, ही ‘योग्य पातळी आणि योग्य किंमत’ ठरवतेस तरी कशी तू?’’
‘‘त्यात काय? एखादा शेअर केव्हा किंवा कोणत्या पातळीला घ्यायचा, आपला नफा कोणत्या किमतीच्या खाली जाऊ द्यायचा नाही वगैरे निर्णयाप्रत यायला माझ्याकडे आयुधं आहेत ना?’’
‘‘आयुधं?’’
‘‘अगं, म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसच्या स्ट्रॅटेजी आहेत ना? मी त्या वापरते आणि मला योग्य दिशा सापडते..’’
‘‘रिया, तू हे जे काय अगम्य शब्द वापरतेस ना ते मला काही कळत नाहीयेत.’’
‘मेट्रो’मध्ये त्या दोन मैत्रिणींच्या अशा गप्पा माझ्या कानावर पडत असतानाच त्यांचं ‘स्टेशन’ आलं म्हणून त्या उतरून गेल्या, पण त्यांचं संभाषण मात्र माझ्या मनात घोळत राहिलं. एकीला ज्यात ‘गम्य’ वाटत होतं तो विषय दुसरीला ‘अगम्य’ वाटत होता. दोन्हीमध्ये फक्त ‘अ’ या अक्षराचा फरक होता, तो ‘अ’ होता अ-अभ्यासाचा. कारण रियाने उल्लेखलेली ‘टेक्निकल ॲनालिसिस’ ही एक अभ्यास पद्धती आहे. चला तर मग, त्यावर विस्ताराने नजर टाकू या.