
नवनव्या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात उपयुक्त वापर केला जात आहे. आतापर्यंत केवळ नैसर्गिक घडणाऱ्या घटनाही तंत्रज्ञानाच्या मदतीने हव्या तेव्हा गरजेनुसार घडविल्या जात आहेत. त्याचेच रंजक उदाहरण म्हणजे, कृत्रिम सूर्यग्रहण. युरोपीय अवकाश संशोधन संस्थेने ही कमाल करून दाखविली आहे.
अवकाश संशोधन हे अभ्यासासाठी अमर्याद संधी आणि शक्यतांचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नैसर्गिक आविष्काराने अवकाशात घडणाऱ्या असंख्य घटनांचा संशोधकांकडून सखोल अभ्यास केला जातो. आपले दैनंदिन जीवनमान सुकर होण्यासाठीच नव्हे, तर हवामान, दूरसंचार, उपग्रहीय निरीक्षण यांसारख्या विविध कामांसाठी अनेक देशांकडून शेकडो उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. त्या माध्यमातून संबंधित देशांनी अवकाश क्षेत्रात भरीव कामगिरीदेखील केली आहे. अमेरिकेची ‘नासा’, भारताची ‘इस्रो’, युरोपची ‘ईएसए’, चीनची ‘सीएनएसए’, रशियाची ‘रॉस्कोमॉस’, जपानची ‘जॅक्सा’, आदी प्रमुख देशांच्या अवकाश संशोधन संस्थांनी या क्षेत्रात अतुलनीय काम केले आहे.