
ज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ‘अविवाहित मातां’ची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसतं. या संदर्भातली काही आकडेवारीदेखील आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रात, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी आपल्या रुग्णालयात या विषयावर जानेवारी २०२३ ते जून २०२४ पर्यंत संशोधन करून आकडेवारी गोळा केली. या काळात जवळपास १२४ अविवाहित माता रुग्णालयात आल्याचं दिसून आलं. या संशोधनातून पुढं आलेली गोष्ट म्हणजे या १२४ मातांपैकी ६७ (५४.३ %) अविवाहित मातांचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं. भारतीय समाजव्यवस्थेसाठी ही निश्चितच धक्कादायक गोष्ट होती. बाकीच्या अविवाहित माता १८ ते २५ वयोगटातल्या होत्या. १२४ पैकी ५१.६१% मुली या ग्रामीण भागातल्या होत्या. उरलेल्या ४८.३९% मुली या शहरी भागातल्या होत्या. या मुली निम्न मध्यमवर्गातून आणि त्या खालच्या आर्थिक स्तरातून आलेल्या होत्या.
शासकीय रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातले लोक उपचारासाठी येत असल्यामुळं हे आर्थिक गट समोर आले असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातल्या दलित, आदिवासी आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करणारे मनीषा टोकले आणि अशोक तांगडे समाजातल्या आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातल्या अल्पवयीन मुली अविवाहित माता बनण्याच्या प्रश्नाविषयी बोलताना म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात अविवाहित मातांचा आकडा वाढतोय. या प्रश्नावर अजून नीट संशोधन झालेलं नाही. बीड जिल्ह्यातून ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर, रस्ताबांधणी मजूर, कापसाच्या जिनींग मिलच्या कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणारे कामगार, यांसारख्या स्थलांतरित कामगारांच्या १८ वर्षांखालील मुलींमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.’’