
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये (शुक्रवारी हा लेख मांडत असताना) सामन्याच्या एक ना दोन तब्बल २७ फलंदाज बाद झाले आहेत. हाच सामना भारतात झाला असता आणि अशाच २७ फलंदाजांना दोन दिवसांत तंबूचा रस्ता पकडावा लागला असता, तर बोंबाबोंब झाली असती. खासकरून इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी खरमरीत कुजकी टीका केली असती; पण जेव्हा फलंदाजांना असे नाचवणारी खेळपट्टी लॉर्डस् मैदानावर बघायला मिळते, तीसुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात, तेव्हा कोणी जास्त काही टीका करताना दिसत नाही. मग चर्चा होते फलंदाजांच्या लयाला जात असलेल्या तंत्राची, टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटला लागलेल्या धक्क्याची. क्रिकेटची पंढरी म्हणल्या जाणाऱ्या मेरलीबोन क्रिकेट क्लबच्या मालकीच्या लॉर्डस् मैदानावर पहिले दोन दिवस फक्त गोलंदाज राज्य करतात तेव्हा सगळे मूग गिळून गप्प बसतात, तेव्हा कमाल वाटते. हाच दुटप्पीपणा मला झेपत नाही. पटत नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होण्याअगोदरपासून सगळे जाणकार म्हणत होते की अनुभव आणि कौशल्याचा विचार करता ऑस्ट्रेलियन संघाचा लढतीवर वरचष्मा असणार. झाले तसेच. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विचारलेल्या प्रश्नांना थोडीतरी उत्तरे देत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने २०० धावांचा टप्पा पार करून दाखवला. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना तसे करणे दर्जेदार ऑसी माऱ्यासमोर कठीण गेले. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांनी ऑसी फलंदाजीला खिंडार पाडले होते; पण पहिल्या डावाप्रमाणेच अष्टपैलू खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीतून बाहेर काढलेले बघायला मिळाले.