esakal | मलाला, मूलतत्त्ववादी आणि मौन
sakal

बोलून बातमी शोधा

Malala Yousafzai}

मलाला, मूलतत्त्ववादी आणि मौन

sakal_logo
By
जतीन देसाई

मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारी मलाला युसुफझाई हिच्यावर पाकिस्तानात हल्ला झाल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले होते. पण अद्यापही पाकिस्तानातील मूलतत्त्ववादी गट तिला विरोध करीत आहेत. तिचे छायाचित्र असलेले पाठ्यपुस्तक पोलिस जप्त करीत आहेत. उदारमतवादी म्हणविणारे गप्प आहेत.

मलाला युसुफझाईच्या नावाचा उल्लेख जरी झाला किंवा मलालाचं छायाचित्र दिसलं तरी पाकिस्तानात धार्मिक मूलतत्त्ववादी आणि सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय)चे नेते खवळून उठतात. मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा आणि त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण व्हावं, यासाठी काम करणाऱ्या मलालाबद्दल कट्टरतावाद्यांच्या मनात तिरस्कार आहे. ‘नोबेल’विजेत्या मलालाचा १२ जुलैला वाढदिवस होता. ती आता २४ वर्षाची झाली. मलालाला तिच्या वाढदिवशी पाकिस्तान, भारत आणि जगभरातून लाखो लोकांनी शुभेच्छा दिल्या. त्यात अनेक नेते, कलाकार यांचाही समावेश होता.

एकीकडे लोक मलालाला शुभेच्छा देत होते, तर दुसरीकडे पाकिस्तानात अनेक जण तिच्या नावाने खडे फोडत होते. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ (ओयुपी) ने ‘समाज विज्ञान’च्या सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेलं पुस्तक जप्त करण्यात पोलिस व प्रशासन व्यग्र होते. लाहोर येथील ‘ओयुपी’च्या कार्यालयात जाऊन पोलिसांनी पुस्तके जप्त केली आणि त्यांना नोटीसही दिली. या पुस्तकात पाकिस्तानच्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची छायाचित्रं आहेत.

त्यात मोहंमद अली जिना, अल्लामा इकबाल, सर सय्यद अहमद खान, लियाकत अली खान, अब्दुल सत्तार इधी, बेगम राणा लियाकत अली खान, मलाला युसुफझाई आदींची छायाचित्रं होती. विरोध फक्त मलालाच्या छायाचित्राला होता. आश्चर्य म्हणजे बेनझीर भुत्तोचं छायाचित्र त्या पुस्तकात नव्हतं. एखाद्या मुस्लिम राष्ट्रात पंतप्रधानपद मिळविणाऱ्या बेनझीर या पहिल्याच महिला पंतप्रधान. तरीही पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांना तिला पुस्तकात स्थान द्यावेसे वाटले नाही.

पाश्चात्त्य देशांच्या मदतीने मलाला पाकिस्तानला बदनाम करत असल्याचं कट्टर गटाचं म्हणणं असतं. मलाला इस्लामला आणि निकाहला बदनाम करत असल्याचा गैरप्रचार ते करत असतात. जूनमध्ये ब्रिटनचे प्रसिद्ध फॅशन मॅगझिन 'व्होग' ला दिलेल्या मुलाखतीत मलालाने "लोकांनी निकाह का केला पाहिजे, हे मला अजूनही कळत नाही. तुम्हाला जीवनसाथी हवा असेल, तर त्यासाठी तुम्हाला लग्नाच्या कागदावर स्वाक्षरी का करायला हवी? ते सहज सहचर्य का असू शकत नाही?", असं म्हटलं होतं. या मुलाखतीनंतर मूलतत्त्ववाद्यांचे पित्त खवळले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. समंजस लोक अशावेळी गप्प राहतात. त्यामुळे या गोंधळ माजविणाऱ्यांचे फावते. जाणत्यांचे मौन सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावरच पडते. पाकिस्तानात सध्या नेमके हेच घडते आहे.

काही सुशिक्षितही मलालाच्या विरोधात

या मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात पंतप्रधान इम्रान खान चकार शब्द काढत नाहीत. त्यांची भूमिका ‘तालिबान’ला मदत करण्याचीच राहिली. ‘हक्कानी नेटवर्क’ नावाची दहशतवादी संघटना उत्तर वजिरीस्तानातून कार्यरत आहे. या नेटवर्कला पाकिस्तानच्या लष्कर आणि ‘आयएसआय’ची मदत आहे. अफगाणिस्तानात भारताविरोधात पाकिस्तान सतत ‘हक्कानी नेटवर्क’चा उपयोग करत आला आहे. सिराजुद्दीन हक्कानी त्याचा म्होरक्या. सिराजुद्दीन हा तालिबानचा दोन क्रमांकाचा नेता आहे. मलालाच्या वाढदिवशी एक अजून घटना घडली.

पाकिस्तानच्या खाजगी शाळांच्या संघटनेने 'आय एम नॉट मलाला' नावाचा माहितीपट वितरीत केला. याचा अर्थ सुशिक्षित समाजातला एक वर्ग मलालाच्या विरोधात आहे. मलालाचं कौतुक किंवा तिच्याबद्दल अभिमान बाळगण्याऐवजी खाजगी शाळेची संघटना मलालाविरुद्ध प्रचार करत आहे, ही खरंतर शोकांतिका आहे. १४ जुलैला ‘पीपीपी’च्या नेत्या शेरी रेहमान यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. शेरी रेहमान यांनी म्हटलं, की पंजाबच्या पाठ्यपुस्तक मंडळाने पाठ्यपुस्तकातून बेनझीर भुत्तोची छायाचित्रं काढून टाकली आणि आता मलालाची.

पाकिस्तानच्या पंजाबात इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ची सत्ता आहे. इम्रान खानवर लष्कराचा प्रभाव आहे. विरोधी पक्ष सुरुवातीपासून म्हणत आले आहेत, की लष्कराने निवडणुकीत केलेल्या 'मदती'मुळे इम्रान खान पंतप्रधान झाले. अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढत असल्याने पाकिस्तान सरकार मूलतत्त्ववाद्यांना मदत होईल,अशी भूमिका घेत जाणार. ‘आयएसआय’ आणि तालिबानचे सुरुवातीपासून जवळचे संबंध आहेत. तालिबानच्या स्थापनेत ‘आयएसआय’ची भूमिका महत्त्वाची होती. अशा परिस्थितीत मलाला आणि इतर महत्त्वाच्या महिला नेत्यांच्या विरोधात कट्टरवादी अधिक आक्रमक होत जाणार आणि सरकारची भूमिका दुर्दैवाने अशा कट्टरतावाद्यांना मदत करण्याचीच राहणार. म्हणूनच लोकांनी मूलतत्त्ववादी विचाराच्या विरोधात बोलणं, स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे.

पुढचा प्रश्न विचारा...

इम्रान खानने गेल्या वर्षी जून महिन्यात पाकिस्तानच्या संसदेत ओसामा बिन लादेन याचा उल्लेख 'शहीद' म्हणून केला. ‘पाकिस्तान सरकारला न कळवता अमेरिकी सैनिक पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे दाखल झाले होते आणि त्यांनी लादेनला मारलं. त्यानंतर सगळेजण पाकिस्तानच्या विरोधात बोलायला लागले.’ असे त्यांनी सांगितले. जूनमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशीची अफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ने घेतलेली मुलाखत गाजली. या मुलाखतीत, शहा महमूद कुरेशी यांनी लादेनला ‘दहशतवादी’ असे म्हणण्यास नकार दिला. ‘टोलो न्यूज’च्या पत्रकार लोतफुल्ला नजफिजादाने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला स्पष्ट शब्दात विचारलेलं की," काय ओसामा बिन लादेन शहीद आहे? तुमचं मत काय आहे?" त्यावर शहा महमूद कुरेशीने उत्तर देण्याचं टाळलेलं. त्यांनी एवढंच म्हटलं, की पुढचा प्रश्न विचारा.