राहुल क्षीरसागर
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर ठाणे जिल्हा आहे. या जिल्ह्यात सात महापालिकांसह पाच तालुक्यांचा ग्रामीण भाग. आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागात हव्या तशा सोयीसुविधा गावपाड्यांवर पोहोचलेल्या नाही. असे असताना ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या आदिवासी दुर्गम गावपाड्यांवर विकासाची कामे करण्यात येत आहेत. ही कामे करताना विजेचा सुरू असलेला लपंडाव, अपुरी इंटरनेट सेवा, दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसताना देखील येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसह त्यांना अक्षर व संख्याज्ञान यांची ओळख व्हावी, यासाठी ‘दिशा’ प्रकल्प हाती घेण्यात आला.
या प्रकल्पामुळे अवघ्या सहा महिन्यांत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीत झालेला आमूलाग्र बदल हा ठाणे जिल्हा परिषदेच्या यशाची दिशा ठरला आहे. तसेच हा प्रकल्प राज्य शासनाने ‘निपुण भारत अभियान’ या अंतर्गत स्वीकारलेला आहे, तसेच कार्यालयीन स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण व कालबाह्य अभिलेख नष्ट करणे, अभ्यागत कक्ष, हिरकणी कक्ष, नागरिकांना जिल्हा परिषदेची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत किऑस्क निर्मिती, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची व विभागनिहाय कामकाजाची व जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणांना जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे.