
Jhanak Jhanak Payal Baje songs
esakal
अब्दुल रशीद कारदार यांचा आणखी पट्टशिष्य एस. यू. सन्नी महत्त्वाकांक्षेने स्वतःची ‘सन्नी आर्टस्’ ही संस्था स्थापन करून मैदानात उतरलेला असतो. त्यांनाही नौशाद साहेबांकडून एक संगीताची मैफल हवी असते. संगीत ही चित्रपटाची हमखास यशाची जणू जादुई किल्ली होती. सन्नी साहेबांनी ‘उडन खटोला’साठी एक काल्पनिक कथा निवडली. उडत्या गालीचासारख्या वस्तूमधून कुणी परदेशी मुसाफिर येतो. स्त्रिया त्याच्या प्रेमात पडतात. त्यात एक खलनायिका असते... मग शेवट शोकांत.. दिलीपकुमार, निम्मी, आगा, जीवन अशी मातब्बर कलाकार मंडळी आणि एक दाक्षिणात्य अभिनेत्री टी. सूर्यकुमारी होत्या... नौशाद साहेबांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यात संगीताबद्दल ते लिहितात, मी सात-आठ वर्षांचा होतो तेव्हा लखनौ स्टेशनवर मास्टर रहमत एक गीत गात असत.
क्यों जा रहा है जालिम मिट्टिको ख्वार करके
पामाल ठोकरोंसे मेरा, मजार करके...
मी मुखड्याची चाल रहमतमियॉँची ठेवली. अंतरा बदलला... गझलचा फॉर्म बदलला, त्याचं गीत केलं. शकील साहेबांनी शब्द लिहिले... ‘ओ दूर के मुसाफिर...’ रफीचं गाणं अजरामर झालं हे सांगायला नकोच. शिवाय यात चर्चबेल आणि कोरल व्हॉइस वापरला. ‘मेरा सलाम ले जा’साठी काउंटर मेलडी वापरली. तर ‘मोरे सैंयाजी उतरेंगे पार’साठी कुलाब्याच्या अफगाण चर्चच्या गायकांचा समूह स्वर वापरला. बालपणी ऐकलेल्या एका दादऱ्याचा उपयोग ‘हमारे दिल से ना जाना...’ या गाण्यात केला... कल्पक प्रयोगांनी सिनेसंगीत बहरास येत होतं...