
Nobel Prize 2025
esakal
रोगप्रतिकारकयंत्रणा आपल्याच पेशींवर हल्ला करत नाहीत, त्या ‘टी-रेग’मुळे. या यंत्रणेशी संबंधित ‘फॉक्स पी-३’ हे जनुक मानवात आणि उंदरातही ‘टी-रेग’सह संपूर्ण प्रतिकारशक्तीशी संलग्न असल्याचे नोबेल मानकऱ्यांनी दर्शविले आहे.
आ पल्या शरीरावर क्षणोक्षणी विविध जीवाणू, विषाणू आणि असंख्य सूक्ष्मजीवांचा हल्ला होतो. यामुळे आपण आजारी पडतोच, असं नाही. कारण आपली प्रतिरोधसंस्था बाह्य हल्ल्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करून अपायकारक सूक्ष्मजीवांच्या हल्ल्याला निष्प्रभ करते. यामध्ये रक्तामधील पांढऱ्या पेशी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या पेशी ‘फॉरिन बॉडी’ किंवा ‘बाहेरचे उपरे कोण?’, ते ओळखतात. त्यांना टी-पेशी (टी-सेल, टी-लिम्फोसाईट) म्हणतात. क्वचित जीवाणूंच्या बाह्य हल्ल्यामध्ये मानवसदृश पेशी असतात. प्रतिरोधसंस्था त्यांचाही निचरा करते. पण यामुळे प्रतिरोध करणाऱ्या ‘टी-सेल’ची भेदक यंत्रणा आपल्या शरीरातील ‘नॉर्मल’ पेशींनाही उपद्रवी ठरते.