

Winter Session of Parliament
esakal
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ‘संचार साथी’ ॲपवरून वादाला तोंड फुटले. ‘एसआयआर’सह अनेक संवेदनशील मुद्द्यांबाबत विरोधी पक्ष आक्रमक आहेत, तर केंद्र सरकारही सरसकट विरोधकांना लक्ष्य करत अधिवेशनाच्या प्रत्यक्ष कामकाज होणाऱ्या १५ दिवसांच्या कालावधीत १४ विधेयके मंजुरीचे सरकारने नियोजन केले आहे. त्यामुळे संसदेचे अधिवेशन संघर्षाचेच ठरणार आहे.
संसद ही चर्चा करण्याची, वादविवादाची, संवाद, समन्वयाची जागा आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून राजकारण होणे स्वाभाविक आहे. परंतु या दोन्ही घटकांकडून संसदेत व्यक्त होणाऱ्या सहमती-असहमतीच्या अभिव्यक्तीतून कायद्यांची निर्मिती होते आणि देशाच्या भाव-भावनाही संसदेत प्रतिबिंबित होत असतात. संसदेचे कामकाज नाही चालले तर वेळ, पैसा वाया जातो; परंतु यातून संसदेसारख्या संस्थेवर असलेला जनसामान्यांच्या विश्वासालाही तडा जात असतो. गेल्या काही वर्षांत संसदीय कामकाजात गोंधळाचे आणि त्यामुळे कामकाज विस्कळित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याचप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाचा कालावधीही घटला आहे.