
निळू दामले
सीरियामध्ये बंडखोरांनी असाद यांची सत्ता उलथवून टाकली. तेथे हंगामी सरकारही स्थापन झाले. परंतु, तेथे खरी लोकशाही स्थापन होण्याची शक्यता कमीच आहे.
२५ जानेवारी २०११ रोजी लाखो तरूण कैरो शहरातल्या तहरीर चौकात गोळा झाले. तरुण वैतागलेले होते. बेरोजगारी होती. महागाई होती. भ्रष्टाचार होता. तरुण मागत होते अध्यक्ष जनरल होस्नी मुबारक यांचा राजीनामा.
आफ्रिकेत, आखाती देशात हुकूमशहा हादरले. लोकशाही आणि स्वातंत्र्याची मागणी तरुण करत होते. आंदोलन एकाएकी उभं राहिलं. जगभराच्या इंटेलिजन्स संघटनांनाही या आंदोलनाची कल्पना आली नव्हती. त्या देशांमध्ये राजकीय पक्ष नव्हते, सार्वजनिक राजकारणाची सवय त्या देशाना नव्हती.