

Social media influence on mental health
esakal
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने वर्षभराचा सर्वात जास्त वापरलेला शब्द यावर जवळपास तीस हजारांहून अधिक नागरिकांकडून कौल मागितला. त्यातून सर्वाधिक वापरला गेलेला शब्द आढळला तो म्हणजे rage bait. त्याचा अर्थ आहे ‘आभासी उन्माद.’ हा शब्द म्हणजे समाजस्थितीचा आरसाच.
एकविसाव्या शतकाची पहिली पंचविशी सरत आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने वर्षभराचा सर्वात जास्त वापरलेला शब्द यावर जवळपास तीस हजारहून अधिक नागरिकांकडून जगभरातून मतदानाद्वारे कौल मागितला. दुसरीकडे त्यांच्याच भाषेच्या जागतिक शब्दसंपदा साठवून ठेवलेल्या ‘विदा’संचाने साधारण ३०० कोटी वापरात असलेल्या शब्दांना चाळणी लावली आणि त्यातून निवड झाली ती `rage bait'' या शब्दाची. याचा अर्थ असाः आभासी किंवा ऑनलाईन माध्यमांवर मुद्दामहून अशा बातम्या-चित्रे-साहित्य टाकत राहणे, ज्यायोगे वाचक व प्रेक्षकांचा उन्माद पराकोटीला जाईल. उन्मादाच्या निखाऱ्यांनी आगी लावत सुटताना ज्या ठिकाणी ही आग लावली आहे, त्या माध्यमावर ट्रॅफिक वाढते राहील, असे पाहणे. अतिशय सुन्न करणारा हा ‘आभासी उन्मादा’चा प्रकार आहे. त्याचे कोलीत हातात घेऊन जगभर वावरणाऱ्या मोठ्या मानवसमूहाचा rage bait हा एक आरसा आहे; कितीही विद्रुप वाटला तरी सत्य असणारा.