

Latur Killari earthquake inequality
esakal
३० सप्टेंबर १९९३... अनंत चतुर्दशीच्या रात्रीनंतरची पहाट होती. गणेश विसर्जनाचा जल्लोष आटोपून सारे झोपी गेले होते. गाढ निद्रेत होते. साखरझोपेत असतानाच पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी उभा महाराष्ट्र हादरला. लातूरजवळच्या किल्लारी गावच्या परिसरात ६.४ रिश्टर स्केलच्या प्रचंड क्षमतेचे भूकंपाचे धक्के किल्लारीच्या परिसरातील बावन्न गावांना बसले. पूर्वापार चालत आलेली या परिसरातली दगडी भिंतींची घरं क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. स्वतःच्याच स्वप्नांना एकत्र करून जीवाच्या आकांताने बांधलेल्या दगडी भिंतींच्या खाली पहाटेच्या गाढ झोपेतच लोक अक्षरशः गाडले गेले. सगळीकडे मृतदेहांचा खच पसरला. दहा हजारांहून अधिक मृत्यू क्षणार्धात झाले. सोळा हजारांहून अधिक जखमी झाले. ३० हजार घरं भुईसपाट झाली... ‘अरे, जगनं-मरनं एका सासाचं अंतर...’ बहिणाबाईंच्या या कवितेचा प्रत्यय साऱ्या जगाला आला. श्वास घेणारी ही सारी गावं अखेरचा निःश्वास तिथंच सांडून शांत-निपचित पडली होती... एकाच छपराखाली असूनसुद्धा त्या गाढ निद्रेत कुटुंबीयांना एकमेकांचा निरोपही घेता आला नाही. आतापर्यंत त्या गावात असणारी रेलचेल ढिगाऱ्याखाली दबून गेली होती... सकाळ होताच तिथल्या शाळेच्या दिशेने दप्तर पाठीला अडकवून धाव घेणाऱ्या लहान मुलांच्या आयुष्याचं कोवळेपण भूकंपानंतरच्या पावसात कुजून गेलं होतं... तिथली मंदिरं, प्रार्थनास्थळं, समाजमंदिरं, प्राथमिक आरोग्य केंद्र इथली एरव्हीची लगबग भूकंपाने पडलेल्या असंख्य भेगांमध्ये केव्हाचीच गुडूप झाली होती... गावातल्या ज्येष्ठांच्या, वृद्धांच्या गाव-गप्पांनी एरव्ही गजबजलेले गावातले पार जुन्या-जाणत्या भव्य विस्तारलेल्या वृक्षांसह इतके खचून गेले होते, की त्यांच्या खुणाही मागे उरल्या नव्हत्या. या जागी एक जिवंत गाव काल-परवापर्यंत होतं, इथे असंख्य आयुष्यं जगत होती, याचा मागमूसही आता उरला नव्हता... गावकुसावरल्या ग्रामदेवता स्वतःचंही रक्षण करू शकल्या नाहीत. उमरगा तालुक्यातील बलसूर गावातलं प्राचीन श्री नीळकंठेश्वर महादेव मंदिर तेवढं सारा संहार पाहत उभं होतं. म्हणून कदाचित तेच महादेवाचं प्राक्तन असावं... बाकी बलसूर गाव उद्ध्वस्त झालं. पृथ्वीने एक कूस बदलल्यावर मानवाचं काय होऊ शकतं, याचा एक तो अंशभर अनुभव होता. माणसाची ताकद, बुद्धीचा गर्व, त्याच्या बलाढ्यतेचा अभिमान सारं सारं पालापाचोळ्यासारखं विखुरलं होतं... निसर्गाने एक आळोखा-पिळोखा जरी दिला, तरी माणूस क्षणात नष्ट होतो, याचा प्रत्यय साऱ्या जगाला आला. नश्वरता, मर्त्यता, क्षणभंगुरता यावर लिहिलेलं जगभरातलं सारं तत्त्वज्ञान, सारी महाकाव्यं शब्दांतून प्रत्यक्ष अनुभवांच्या भूमीवर तिथे उतरली होती.