

Effects of war on health
esakal
डॉ. दिलीप निकम
युद्धाचा परिणाम केवळ तत्कालीन राहत नाहीत; तर तो संपूर्ण पिढीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आघात करतो. सध्या सुरू असलेली युद्धे संपुष्टात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकारासारख्या संस्थांनी युद्धजन्य परिस्थिती टाळण्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत.
आखाती युद्धाची भीषणता दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. त्याचे गंभीर परिणाम जगातील सर्वच क्षेत्रांवर होत आहेत... येत्या काळातही होतीलच. युद्धाचा सर्वाधिक परिणाम मानवी आरोग्यावर होणार आहे. जागतिक आरोग्य संघटना, युनायटेड नेशन्स आदींनी त्यावर आता चिंता व्यक्त करायला सुरुवात केली असली तरी एकूणच इस्राईल, इराण आणि इतर देशांमध्ये होत असलेल्या विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचे चित्र भयावह आहे. तेल आणि वायू कंपन्यांसोबत नैसर्गिक स्रोत उद्ध्वस्त करून एकमेकांची कोंडी केली जात असली तरी त्यात ज्यांचे बळी जाताहेत, ज्यांना आयुष्यभरासाठी अपंगत्व येतेय किंवा विविध आजारांना सामोरे जावे लागते, त्याबाबत फार चर्चा होत नाही. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील एका रुग्णालयावर केलेल्या भीषण हल्ल्यात ४०० पेक्षा जास्त रुग्णांचा आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा नाहक बळी गेला. हे सर्व पाहून मन बधिर होते. माणूसच माणसाला मारण्यासाठी एवढा का उतावीळ झाला आहे? युद्धांदरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले जाते. आता जर रुग्णालयेच युद्धात टार्गेट केली जात असतील तर रुग्णांचे उपचार करायचे तरी कसे, असे असंख्य प्रश्न आखाती देशातील युद्धाने निर्माण केले आहेत.