

Bonded labor struggle
esakal
आजही व्यवस्थेत असंख्य पठाण-शेटे भेटतातच. जशी मंगल्या-देवकीबाईची वेदना आजही आम्हाला जागोजागी भेटतेय तशाच पठाण-शेटे या मालकधार्जिण्या कोडग्या मानसिकताही भेटतात. त्यांच्याशी लढताना संघटना कधी जिंकते; तर कधी संघटनेला उपेक्षा, पराभवालाही सामोरं जावं लागतंय... ‘आपला कधीच विजय होणार नाही.’ असं वाटावं इतकं नैराश्य लढताना आजही संघटनेला येतं; पण तरीही संघटना अशा असंख्य मंगल्या-देवकीबाईंसाठी लढतेय. लढत राहील...
एकूण परिस्थिती कायद्याच्या दृष्टीने बिनतोड होती; पण पोलिसांच्या भयापोटी देवकीबाईला वेठबिगारीतून सुटका नको होती, कारण पोलिसांची नाराजी तिला टाळायची होती. त्यामुळे आमची लाख इच्छा असली तरी कोणताच कायदा आमच्या मदतीला येऊ शकत नव्हता.
जून १९८५... सोमवारचा दिवस होता तो. उच्च न्यायालयातील सुनावणीचा दिवस अखेर उजाडला होता. मंगल्या न्यायालयीन प्रक्रियेपासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. तो न्यायालयच आयुष्यात प्रथम पाहत होता. मुसळधार पावसामुळे त्या दिवशी मुंबई बंद होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सरकारी वकील बदलले. चौकशीबाबत नवे सरकारी वकील काहीच सांगू शकले नाहीत. अखेरीस देवकीबाई आणि तिच्या आईला ८ जुलैला कोर्टात हजर करा, असा लेखी आदेश न्यायमूर्ती बी. एस. शहा आणि न्यायमूर्ती एस. एम. खत्री यांना द्यावा लागला. त्याच दिवशी संध्याकाळी चौकशीचे निष्कर्ष असलेलं प्रतिज्ञापत्र घेऊन रबाळे पोलिस ठाण्याचे अधिकारी हजर झाले.