

History of Bandook
esakal
आयुधांमध्ये दोन प्रकार असतात - ‘शस्त्र’ म्हणजे हातांनी चालवली जाणारी आणि ‘अस्त्र’ म्हणजे यंत्र, अग्नि किंवा कुठल्याही बाह्य कृत्रिम शक्तीने चालवली जाणारी आयुधं! अस्त्रांच्या जगात आगीचा वापर हा भारतात, भारताबाहेर पूर्वापार होत होता. आगीचे पेटते बाण, भाले अशी शस्त्रं वापरात होतीच, पण त्यांना अधिक घातक स्वरूप मिळालं ते आगीला ‘बारूद’ अथवा ‘अग्निचूर्णा’ची जोड मिळाल्यावर! बारूद आणि अग्नी यांच्या मिश्रणाने युद्धभूमीवर एकाच वेळी मोठ्या संख्येने जीवितहानी करणं, विध्वंस करणं शक्य होऊ लागलं आणि आग्नेयास्त्रांनी युद्धांमध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. या अस्त्रांमध्ये अग्निबाण, तोफा, जंबुरिये होते आणि सगळ्यात महत्त्वाच्या होत्या, त्या बंदुका!
विकास
कुठल्याही शस्त्राचा विकास होताना ते लहान आकारातून मोठ्या आकाराकडे जातं. अस्त्रांच्या बाबतीत मात्र ही साखळी उलटी आहे. म्हणजे असं की, जेव्हा तोफा विकसित झाल्या, तेव्हा त्या रणांगणावर प्रभावीपणे वापरल्या जाऊ लागल्या. तोफा चालवणाऱ्यांना वाटलं की, अरे, हे इतकं चांगलं अस्त्र आहे, याचा आकार थोडा छोटा केला तर.. अगदी हातात धरून वापरता येईल एवढा? म्हणजे ते कुठेही नेता येईल असा? याच विचारातून आणि गरजेतून बंदुकींचा विकास झाला. मोठ्या आकाराच्या तोफांमध्ये सुधारणा आणि तंत्रविकास होऊन त्यातून हळूहळू चौदाव्या-पंधराव्या शतकात बंदुका निर्माण झाल्या. याचमुळे बरीच वर्षें बंदुकांना ‘हॅन्ड कॅनन’ म्हणजे हातात धरून चालवायची तोफ असंच म्हटलं जायचं. बंदुकांसाठी इंग्रजीत वापरला जाणारा ‘गन’ हा विशिष्ट शब्द साधारण सोळाव्या शतकापासून रूढ झाला.