
स्मिता मिश्रा
हिंदू’ किंवा ‘भगवा दहशतवाद’ असे लेबल लावण्याचा प्रकार पुन्हा एकदा फसला आहे. प्रथम समझोता एक्स्प्रेस स्फोट, नंतर हैदराबादमधील मक्का मशीद स्फोट आणि शेवटी मालेगाव स्फोट या तिन्ही मोठ्या प्रकरणांमध्ये हेच घडले. सर्व प्रकरणांमध्ये आरोपींना दोषी सिद्ध करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले. समझोता एक्स्प्रेस आणि मक्का मशीद स्फोटांमध्ये स्वामी असीमानंद असो किंवा मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, सर्वच आरोपी निर्दोष सुटले.
सन २००८ मध्ये झालेल्या मालेगाव स्फोट प्रकरणानंतर पहिल्यांदा ‘हिंदू दहशतवाद’ असे लेबल लावण्यात आले. स्फोट झाल्यानंतर एक महिन्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना पचमढीहून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिकृतपणे एक आठवड्यानंतरच अटक केल्याचे दाखवण्यात आले. पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा यांना देशातील ‘भगवा दहशतवादा’चे चेहरे बनवण्यात आले. २००७ मध्ये घडलेल्या मक्का मशीद स्फोट आणि समझोता एक्स्प्रेस स्फोटांनाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी पाठिंबा दिलेल्या हिंदू अतिरेकी गटांचे काम म्हणून ‘लेबल’ करण्यात आले. समझोता एक्स्प्रेस स्फोटात अरिफ कासमानी आणि सिमीच्या दहशतवादी सरदार नागोरी यांनी स्फोट केल्याची कबुली दिली होती. ‘तत्कालीन सरकारच्या भारत-पाकिस्तान वाटाघाटी विस्कळित करण्यासाठी हा स्फोट केला होता,’ असे या दोघांनी सांगितले.