

Five State Assembly Elections 2026
esakal
संजय कुमार प्राध्यापक - सीएसडीएस अर्थात सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज
देशातील बहुचर्चित, महत्त्वाच्या अशा तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांतील विधानसभांसाठी ८२४ जागांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या राज्यातील निकालांचा परिणाम राष्ट्रीय राजकारणाच्या स्थिरतेवर होणार नसला तरी राष्ट्रीय राजकारणात ज्या राष्ट्रीय आघाड्या आहेत. त्यांच्यावर मात्र नक्की परिणाम होणार आहे.
देशातील महत्त्वाच्या अशा पाच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पाच राज्यांत लोकसभेच्या ११६ जागा येतात हे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने या निवडणुका राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचीच ही लढाई असणार आहे. आसाम आणि केरळसारख्या राज्यात भाजप, काँग्रेस व डावी आघाडी या राष्ट्रीय पक्षांत थेट लढत होईल. तर तमिळनाडू, पुदुच्चेरी व पश्चिम बंगालसारख्या राज्यांत तृणमूल काँग्रेस (टीएमसी), द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) व आॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) या प्रादेशिक पक्षांची या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असेल. त्याशिवाय तमिळनाडू, आसाम व केरळमध्ये या पक्षांशिवाय इतरही महत्वाचे प्रादेशिक आहेत जे आपली राजकीय ताकद आजमावून बघणार आहेत. मात्र यातील बहुतांश पक्ष त्या त्या राज्यांतील प्रमुख राजकीय पक्षांच्या आघाड्यांचा एक भाग आहेत. या निवडणुका पुन्हा एकदा या पक्षांना त्यांच्या राज्यांत असणारा राजकीय पाठिंबा, संघटनात्मक ताकद व विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे नेतृत्व गुणाची परीक्षा घेणाऱ्या असतील. या परीक्षेवरच या पक्षांच्या भविष्यातील वाटचालीचे राजकीय यश जोखले जाईल. केवळ प्रशासकीय यश किंवा लोककल्याणकारी राजकारणच नव्हे, ते तर महत्त्वाचे आहेच मात्र त्याशिवाय संघटनात्मक ताकद व नेतृत्वगुणांची गुणवत्ता ही कौशल्येही सर्वाधिक महत्त्वाची आहेत.