

Global energy crisis
esakal
युद्धादरम्यान अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांवर सूड म्हणून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकाबंदी केली आणि त्याचा परिणाम जगाच्या तेलपुरवठ्यावर झाला. भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करणाऱ्या देशामध्ये इंधन पुरवठा विस्कळित होण्याबरोबरच इतर अनेक बाबींवरही या परिणामांची छाया पसरली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठादार देशांमधील युद्धाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर थेट आणि तत्काळ परिणाम होऊन इंधनाचे दर भडकतात, याचा अनुभव जगाने १९९०च्या दशकातील कुवेत युद्धावेळी आणि २०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धावेळी घेतला आहे. केवळ चार वर्षांत तशी स्थिती पुन्हा निर्माण होणे, हे सध्याच्या अस्थिर जागतिक स्थितीचे निदर्शक आहे. पश्चिम आशिया हा जगातील सर्वांत महत्त्वाचा तेलउत्पादक प्रदेश असल्यामुळे येथे निर्माण होणाऱ्या राजकीय आणि लष्करी संघर्षांचा परिणाम थेट जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारावर आणि परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर होतो.
इराणचे नियंत्रण असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के तेलाचा व्यापार होतो आणि मागील वर्षी आशियात एकूण झालेल्या तेल आयातीपैकी ९० टक्के आयात याच मार्गावरून झाली होती. सामरिक आणि सागरी मालवाहतुकीच्या दृष्टीने हा इतका महत्त्वाचा असलेला मार्ग इराणने बंद केल्याने तेलाचा तुटवडा निर्माण होऊन जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रत्येक पिंपामागे १०० डॉलरपर्यंत वर गेल्या आहेत. या संकटात आणखी भर पडून त्याचे खापर आपल्या माथी फुटायला नको म्हणून इतर देशांनी रशियाकडून तेलखरेदी केली तरी आयात शुल्काचा बडगा न उगारण्याचे धोरण अमेरिकेला स्वीकारावे लागले आहे.