

Indian Economy and Currency Depreciation
esakal
रुपयाच्या विक्रमी घसरणीने सिद्ध केले आहे, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आणू शकते. महागाई, उच्च व्याजदर आणि कर्जाचा वाढलेला बोजा हे तत्काळ धोके आहेत. १०० पर्यंत रुपया घसरेल या काही तज्ज्ञांनी केलेले भाकीत दुर्दैवाने खरे झाल्यास केवळ तात्पुरत्या उपायांवर (उदा. रिझर्व्ह बॅंकेचा डॉलर विक्री हस्तक्षेप) अवलंबून चालणार नाही. सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात समन्वय साधून दीर्घकालीन संरचनात्मक बदल करणे आवश्यक आहे.
रुपयाभवती फिरते दुनिया’ हे विधान आता बदलण्याची वेळ आली आहे. याला कारण म्हणजे ३ डिसेंबरची धक्कादायक घटना. एकीकडे अर्थव्यवस्थेने ८.२ टक्के वाढीचा दर दाखवला अन् भांडवली बाजारात शेअर निर्देशांकाला (सेन्सेक्स) नवीन उच्चांकाची चाहूल लागलेली असताना देशाच्या चलनाने मात्र आठवडाभर चाललेली घसरण कायम राखत प्रति डॉलर ९० चा भावनिक स्तर ओलांडला. अन् तो ९०.१५ या ऐतिहासिक तळाशी बंद झाला. रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्यानंतर ८९.९६ पर्यंत स्थिरावला. पण परत दुसऱ्या दिवशी ९०.३० या नवीन ऐतिहासिक नीचांकी पातळीपर्यंत लोळण घेतली. ९० चा स्तर ओलांडणे ही घटना तुम्हाला आम्हाला अस्वस्थ करणारी वाटली तरी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. नागेश्वरन यांना वाटतेय, की माझी झोप उडून जाईल इतकी भीतीदायक प्रतिकूल परिस्थिती ओढवलेली नाही. ते पुढे असेही म्हणतात, ‘सध्याच्या रुपयाच्या घसरणीने गाठलेल्या पातळीमुळे चलनवाढीचा ताण वाढलेला नाही किंवा भारताच्या निर्यातीच्या गतीलाही धक्का बसला नाही.’ - हे त्यांचे विधान कितपत खरं आहे किंवा नाही याबाबत तज्ञांच्या मनात शंका आहे. पण नव्वदीच्या पार गेलेला हा विनिमय दर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटाच आहे. त्यासाठी रुपया घसरणीमागे नेमकी कुठली आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कारणे आहेत त्याचा धावता आढावा घेऊयात.