

Women’s World Cup India
esakal
डी. वाय. पाटील मैदानावर हरमनने विश्वचषक हाती घेतला. मग संपूर्ण संघाने मैदानाला फेरी मारत क्रिकेट चाहत्यांच्या कौतुकाचा स्वीकार केला. मग हरमनने शुभांगी कुलकर्णी, मिताली राज, झुलन गोस्वामी, नीलिमा बर्वेसह हजर असलेल्या महान माजी महिला खेळाडूंकडे स्वत: जाऊन त्यांना विश्वचषक हाती दिला. जितका हा विजय विजेतेपद मिळवणाऱ्या संघाचा आहे, तितकाच तो महिला क्रिकेटसाठी रक्त आणि घाम गाळणाऱ्या माजी खेळाडूंचा आहे, असेच हरमनला न बोलता सांगायचे होते.
घवघवीत यश मिळाल्यावर काही लोकांना कमालीची गुर्मी चढते तर काही मोजक्या लोकांना विनम्र व्हायला होते. २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यावर धोनी आणि सचिनने सुधीर गौतमला बोलावून विश्वचषक त्याच्या हाती देत संपूर्ण संघासह मानवंदना दिली होती. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वर्षानुवर्षं भारतीय संघाला दिलेल्या आवाजी पाठिंब्याला दिलेली ती प्रतीकात्मक मानवंदना होती.