
नरोरा धरणातून सहा हजार क्युसेक्स एवढे अधिकचे पाणी सोडून प्रदूषित पाणी तुम्ही फ्लश केले; पण त्याने नदी प्रदूषणमुक्त झाली का? ते असे आहे ना, कदाचित तुम्ही जर पेनकिलर घेतली, तर काही काळासाठी आजाराची लक्षणे कमी होतीलही; पण तुम्हीच सांगा तुम्हाला झालेला आजार बरा होईल का?
डॉ. प्राक्तन वडनेरकर
w.praktan@gmail.com
कुंभमेळ्याला देश-विदेशातील कोट्यवधी भक्तांनी हजेरी लावली आहे; पण तिथे वाहणाऱ्या गंगा आणि यमुनेचे काय? वेळोवेळी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने त्यांच्या पाण्यातील प्रदूषणावर ताशेरे ओढले आहेत. फक्त कुंभमेळ्यापुरतेच नाही तर एकूणच नदीच्या स्वच्छतेसाठी शाश्वत कृषी पद्धती आणि योग्य भूमीवापर अत्यंत महत्त्वाचे आहे. गंगेवरील श्रद्धा असलेले सर्व भाविक कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकत्र येतात, तर ही जनजागृती मोहीम राबवण्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
सध्या सर्वत्र प्रयागराजमधील कुंभमेळ्याच्या, अवलिया साधूंच्या आणि उत्तम नियोजनाच्या व्हिडिओंचीच चर्चा आहे. साधारण सव्वा महिनाभरात तब्बल १२ कोटी नागरिक कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी दीड लाख स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढे भलेमोठे आकडे कुंभमेळ्याची भव्यता दाखवतात.