

Bollywood underworld connection 2026
esakal
गिरीश वानखेडे - girishwankhede101@gmail.com
आपली हिंदी चित्रपटसृष्टी १९८०च्या रोमँटिक युगापासून ते वास्तववादी-कठोर कथांकडे अन् गुन्हेपटांकडे वळणे म्हणजे समाजातील आदर्शवादाच्या ओहोटीचे प्रतिबिंब होते. काही चित्रपटांनी गोरख धंदे करणाऱ्या तस्करांना अधिकच ‘आदर्श’ स्वरूप दिले, ज्यामुळे गुन्ह्यांचे रोमँटीकरण होऊ लागले, जे धोकादायक आहे.
बॉलीवूडला हादरवून टाकणाऱ्या एका धक्कादायक घडामोडीत, अभिनेता रणवीर सिंगला १० फेब्रुवारी रोजी व्हॉट्सॲपवर धमकी देणारी एक व्हॉइस नोट मिळाली. ज्यामध्ये १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खंडणीची मागणी करण्यात आली होती. संबंधित ‘संदेश’ कथितपणे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख हॅरी बॉक्सरकडून आल्याचे सांगितले जात असून पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली होती. ‘तुमच्या पुढच्या सात पिढ्याही आम्हाला हात लावू शकत नाहीत,’ असा इशाराही त्यात देण्यात आला होता. त्यानंतरच्या अवघ्या एका दिवसात सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याला एका एन्क्रिप्टेड प्रोटॉन ई-मेलद्वारे अशीच धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने बिश्नोई टोळीशी आपला संबंध असल्याचा दावा केला आणि मोठी खंडणी मागितली. या घटना १९९८च्या काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर घडल्या आहेत. काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समुदायाचा या प्राण्याबद्दलचा आदर दुखावला गेला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई सुरू केली असून टोळीच्या शुभम लोणकर गटातील सदस्यांसह संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १९९०च्या दशकातील अंडरवर्ल्ड पुनरागमनाची भीती व्यक्त केली जात आहे.