
शरत प्रधान
प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू असून, कोट्यवधी भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. धार्मिक संस्कृतीमध्ये कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर, या कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी राज्य सरकारला काही महिन्यांपासून करावी लागते. यंदाचा महाकुंभमेळा विक्रमी गर्दी, मौनी अमावस्येची चेंगराचेंगरी, त्यानंतरचे आरोप-प्रत्यारोप, व्हीआयपींचे जास्त प्रमाण या विषयांमुळे चर्चेत आहे.
प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा होत असून, या पवित्र काळामध्ये स्नानाची पर्वणी साधण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक काही दिवसांपासून प्रयागराजला जात आहेत. भारतात चार ठिकाणी पुरातन काळापासून कुंभमेळा होत असून, समाजातील सर्वच स्तरातील घटकांचे या कुंभमेळ्याकडे कायमच लक्ष वेधलेले असते.