

Parliament Budget Session India
esakal
अजय बुवा
काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर नऊ मार्च रोजी चर्चा होणार असून, हा प्रस्ताव फेटाळण्यासाठी सरकार पूर्ण ताकद लावणार, हे निश्चित आहे. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे आणि सरकार-विरोधकांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी असणाऱ्या अध्यक्षांविरोधातच अविश्वास प्रस्ताव येणार असेल, तर संसदेचे कामकाज सुरळीत चालणार कसे, हा प्रश्न उरतो.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्या आठवड्यात सरकार आणि विरोधकांमध्ये दिसलेला विसंवाद हा दोन्ही बाजूंमध्ये कटुता वाढविणारा असल्याचे जाणवत होते. मात्र, ही कटुता लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना हटविण्याची मागणी करणारा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याइतपत टोकाला जाईल, असे वाटले नव्हते. नेमकी ती वेळ आली आणि आपल्या लोकशाही व्यवस्थेपुढील अनेक महत्त्वाच्या आव्हानांपैकी, सरकार व विरोधकांमधील सुसंवादाची आवश्यकता हे आव्हानही अधोरेखित झाले आहे. आतापर्यंत लोकसभेमध्ये सरकार व विरोधकांमधील विसंवादावर तोडगा काढण्यासाठी लोकसभाध्यक्षांकडून पुढाकार घेतला जात होता. एका अर्थाने, वादाच्या प्रत्येक प्रश्नावर पीठासीन अधिकारी हे अंतिम उत्तर होते. आता अविश्वास प्रस्तावातून या उत्तरावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.