

Trump-Iran War Crisis
esakal
पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या मुद्द्यावरून भारतात घमासान सुरू झालं, हेही तसं आपल्याकडील राजकीय रिवाज पाळणारच. त्यांच्या मध्यस्थीची संभावना दलाली अशी आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. इराणवरच्या हल्ल्यावर मौनात राहणं, अमेरिकेवर टीका टाळणं हे आपलं सध्याचं धोरण. ही काळजी अमेरिकशी व्यूहात्मक भागीदारीसाठी. दुसरीकडं पाकिस्तान मात्र हल्ल्यासाठी अमेरिकेला बोल लावतो तरीही ट्रम्प यांच्या विश्वात पाकिस्तान अधिक महत्त्वाचा ठरतो, हे त्रासदायकच नाही काय. सवाल जगात स्थान उंचावल्याचं श्रेय दिलं जाणाऱ्या सरकारच्या महानायकांच्या प्रतिमेचा आहे.
अमेरिका आणि इस्राईलनं इराणवर हल्ला केला, त्याला अमेरिका अधिकृतपणे युद्ध म्हणत नसली, तरी युद्धाहून त्यात काहीच कमी नव्हतं. या युद्धाला महिना होत आला असताना दोन्ही देशांची सारी हवाई ताकद आणि अमेरिकेची कोणत्याही देशाची कोंडी करू शकणारी निर्बंध लावण्याची ताकद जमेला धरूनही इराणचा पाडाव होत नाही. इराणचा अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम नष्ट करायचा, तेथील सत्ता उलथवायची, इराणला संपूर्ण शरणागती पत्करायला लावायची, यातलं काहीही घडत नाही. उलट युद्ध... युद्ध खेळून आणि केवळ त्यावरच समाजमाध्यमांवर लिहून कंटाळा आल्यासारखं डोनाल्ड ट्रम्प पाच दिवसांची मुदत वाटाघाटीसाठी ठरवून टाकतात. युद्ध संपवण्यासाठी काय करावं याच्या अटी म्हणजे पुन्हा ट्रम्प यांची विश लिस्ट देतात. ज्यांनी दाती तृण धरून शरण यावं अशी अपेक्षा तो इराण सांगतो, अमेरिकेच्या अटी तर मान्य नाहीतच पण युद्ध संपवायचं तर आमच्या अटी ऐका. असं का व्हावं. अमेरिकेच्या अहंकाराला टाचणी लावणारा हा क्षण. त्यासोबत थांबलं युद्ध तर बरंच म्हणून जग वाट पाहतं आहे आणि नाही थांबलं तर ते किती चिघळणार याच्या विवंचनेतही आहे. ही ट्रम्प यांच्या अमेरिकेची ओढवून घेतलेली युद्धकोंडी आहे.