

Pune Book Festival 2025
esakal
लोकं पुस्तक महोत्सवाला येऊन पुस्तकं विकत घेऊन वाचतात, मात्र त्यासाठी लोकांच्या गरजा-आवडीनिवडींचा काटेकोर विचार आयोजकांनी करायला हवा. पुणे पुस्तक महोत्सवात हाच विचार झाल्यानं महोत्सवात साडेबारा लाखांहून अधिक पुस्तकप्रेमी सहभागी झाले आणि पन्नास कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली. त्यातून महोत्सवात पावलोपावली वाचकांचं स्वप्न फुललं...
पुस्तक जिव्हाळ्याचा विषय असलेल्यांसाठी तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवातली वाचकांची अलोट गर्दी, पिशव्या भरून पुस्तकं खरेदी करणारे वाचक असे अत्यंत आनंददायी दृश्य होतं. पुस्तकप्रेमी सर्व वयोगटातले होते. लहानगी मुलं-मुली पालकांसमवेत पुस्तकं चाळत होती. कॉलेजची मुलं-मुली, पालक वयातले प्रौढ, आजी-आजोबा वयोगटातले ज्येष्ठ नागरिक अशी सारीच मंडळी पुस्तकांमध्ये रमली होती. तब्बल नऊ दिवस पुस्तकांचा हा उत्सव सुरू होता. पहिल्या दिवशीचा प्रतिसाद अखेरच्या तासापर्यंत टिकून होता. आकड्यांमध्ये सांगायचं, तर महोत्सवात पुस्तकांची आठशेहून अधिक दालनं, पन्नास लाखांहून अधिक पुस्तकं आणि साडेबारा लाखांहून अधिक पुस्तकप्रेमी सहभागी होते. अखेरच्या दिवसापर्यंत पन्नास कोटी रुपयांहून अधिक रकमेची एकूण सुमारे तीस लाख पुस्तकं वाचकांनी खरेदी केली.