

IndiGo Airlines Crisis
esakal
भारतासारख्या मोठ्या देशात एकाच एअरलाइनची मक्तेदारी असणे देशाच्या हवाई कनेक्टिव्हिटी व अर्थव्यवस्थेस किती धोकादायक ठरू शकते, हे ‘इंडिगो’च्या गोंधळातून स्पष्ट झाले. देशातील एअरलाइन उद्योग हा अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि समतोल असण्याची गरज प्रकर्षाने समोर आली. नागरी हवाई वाहतूक क्षेत्राने गेल्या काही दिवसांत अनुभवलेले ‘इंडिगो’चे संकट हे अत्यंत अनपेक्षित व अभूतपूर्व होते.
भारतातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राने गेल्या काही दिवसांत अनुभवलेले ‘इंडिगो’चे संकट हे अत्यंत अनपेक्षित व अभूतपूर्व होते. जवळजवळ दोन दशकांची विश्वासार्हता, वेळेचे काटेकोर पालन आणि कार्यक्षम व लोकप्रिय सेवा अशी ओळख असलेली ‘इंडिगो’ ही गेल्या काही दिवसांत विस्कळीत वेळापत्रक, रद्द झालेली हजारो उड्डाणे, अवाजवी विलंबाने ताटकळलेले व त्रासलेले हजारो प्रवासी, त्यांच्या सामानाचा लागलेला ढीग, याने देशभरातील विमानतळांवर उडालेला प्रचंड गोंधळ, यामुळे मोठ्या टीकेचे धनी झाली. प्रवाशांना पूर्वसूचना न देता उड्डाणे रद्द होणे, तासनतास उड्डाणे विलंबित करून मग रद्द करणे, क्रू उपलब्ध नसणे, प्रवाशांसाठी पर्याय, पुढचे नियोजन याची कर्मचाऱ्यांना माहिती नसणे या सगळ्यामुळे प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन बिघडून त्यांचे अतोनात हाल झाले. व्यावसायिक कामे, वैद्यकीय अपॉइंटमेंट, विवाहसमारंभ, अंतिम संस्कार, परदेशी जाण्यासाठी कनेक्टिंग फ्लाइट, परीक्षा व इतर अनेक महत्त्वाच्या व तातडीच्या कारणांसाठी देशभरातून या भरवशाच्या एअरलाइनने प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी हे सगळेच अकल्पित व धक्कादायक होते.