Child marriage and pocso
Esakal
लक्ष्मीकांत देशमुख
लग्न करून त्याच्या घरी गेली आणि त्यांची पहिली रात्र साजरी झाली... तिला हे माहीत नव्हतं, की जर घरच्यांनी तक्रार केली, तर पॉक्सो कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणं हा बलात्कार ठरतो आणि त्यासाठी सूरजला तत्काळ अटक होऊ शकते व दहा-वीस वर्षांचा तुरुंगवासही...
सायंकाळी ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर आधी न्यायमूर्ती पाटील व न्यायमूर्ती शहांनी सुनावणी करत सर्व केसेस संपवल्या. आपल्या चेंबरकडे जाताना पाटलांची नजर शेवटच्या रांगेकडे गेली. ती स्त्री दिवसभर तिथं बसली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आज सुनावणी सुरू झालेल्या दोन नव्या अपिलातल्या कोणत्या प्रकरणातील ती अशील असेल? पॉक्सो प्रकरणातली?
दुसऱ्या दिवशीपण ती दिवसभर कोर्टरूममध्ये उपस्थित होती. शांत. निर्विकार. तिला इंग्रजीत चाललेलं कोर्टाचं कामकाज समजत नसणार, हे उघड होतं. पण तरीही ती क्षणभरही बाहेर जात नाही, हे त्यांनी हेरलं होतं.
तिसऱ्या दिवशी कोर्टाचं कामकाज संपल्यावर न्यायमूर्ती पाटलांना राहवलं नाही. पोलिसांना सांगून त्यांनी तिला आपल्यासमोर बोलावलं आणि जाण्याच्या तयारीत असणाऱ्या तरुण पण अभ्यासू वकील विकास घुगेंना थांबायला सांगितलं.
त्याच विटक्या रंगाच्या साडीत, तशाच अस्ताव्यस्त केसातली ती स्त्री आपल्या खांद्यावर झोपलेल्या छोट्या मुलीला थोपटत त्यांच्यापुढे उभी राहिली. ती घाबरलेली दिसत होती. तिला आश्वस्त करीत पाटील म्हणाले, ‘‘मराठी समजतं ना?’’ तिनं ‘‘होय साहेब’’ म्हणून उत्तर दिलं. आता पाटलांच्या लक्षात आलं, की ती कोवळी पोरसवदा तरुणी आहे. कदाचित नाबालिग. पण परिस्थितीच्या ओझ्यानं अकाली प्रौढत्व आलं असणार. त्यांचा जीव काहीसा कळवळला. आपल्या आवाजात मार्दव आणत ते म्हणाले, ‘‘पोरी, घाबरू नकोस. मला सांग, गेले तीन दिवस तुला पाहतो आहे, इथं तुझी केस आहे का?’’
‘‘म... मला म्हाइत नाय साहेब. पण... पण ही नोटीस आली होती माझ्या गावी. पोलिसांनी इतं ममईला जायला सांगितलं, म्हणूनशानी आले.’’ असं म्हणत तिनं ब्लाऊजमध्ये ठेवलेला नोटिशीचा कागद काढला व त्यांना द्यायला लागली, तेव्हा तिथल्या पोलिसानं तो कागद घेऊन त्यांच्या स्टेनोला दिला. तो स्टेनो ती नोटीस पाहत म्हणाला, ‘‘सर आज जी सूरज घोडकेच्या केसची सर्वांत शेवटी सुनावणी झाली, त्या पॉक्सो केसमधली ही चंद्रा घोडके पीडिता दिसतेय...’’
न्यायमूर्तींनी त्या नोटिशीवर नजर फिरवली व तिच्याकडे पाहिलं. हीच ती पीडिता आहे, याची त्यांना खात्री पटली. ते विचारतात, ‘‘मग तू वकील नाही दिलास?’’
तिनं नकारार्थी मान हलवली, ‘‘मी... मी माज्या घरधन्यास्नी हुडकत हुते. ते इथं असतील असं गावी पोलिसांनी सांगितलं होतं. पण... म्या चुकून इतं आले का सायेब? माजं चुकलं...’’
‘‘नाही पोरी. इथंच आमच्यापुढे सूरज घोडकेची केस सुरू आहे. पण तो इथं हजर नाही. त्याच्या वकील अॅड. गोखले मॅडम आहेत. त्या केस संपल्यावर गेल्या. नाहीतर...’’
‘‘म... मला इतं का बोलवलं सायेब? उसनवार करून पैका जमवून आले. इतंच रात्री राहत हाये. उद्या बी राहायचं?’’
‘‘हो पोरी. पण तू वकील का दिला नाहीस?’’
‘‘येगळा वकील कसा दिवू सायेब? मी फार गरीब हाय. पुना घरधनी सहा महिन्यांपासून जेलमध्ये हाये ना!’’ आणि बोलता बोलता ती अकाली मातृत्व प्राप्त झालेली पोरसवदा मुलगी सद्गदीत झाली. तिनं साडीच्या पदरानं डोळे पुसत पदर तोंडावर दाबून धरला... हुंदक्याचा आवाज या बड्या जजसाहेबापुढे फुटू नये म्हणून.
न्यायमूर्ती पाटील काही क्षण शांत. विचारात गढले. मग त्यांनी वकील विकास घुगेकडे पाहिलं.
‘‘अॅडव्होकेट घुगे, कॅन यू असिस्ट अस बाय बिइंग हर अॅमिकस क्युरी?’’
विकास घुगे तिशीतला तरुण वकील. दोन वर्षांपासून हायकोर्टात सीनियर वकिलांना असिस्ट करताना काही केसेस स्वतंत्रपणे त्यानं हाताळल्या होत्या. त्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि कायद्याची जाण न्यायमूर्ती पाटलांच्या लक्षात होती, म्हणून त्यांनी क्षणार्धात त्याला अॅमिकस क्युरी - न्यायलायाचा मित्र होण्याची विनंती केली. त्यानं आज वेळ होता म्हणून पॉक्सो न्यायालयानं वीस वर्षांची शिक्षा ठोठावलेल्या सूरज घोडकेच्या विधिज्ञ ज्योत्स्ना गोखले मॅडमचा युक्तिवाद पॉक्सो कायदा नीट समजावा म्हणून ऐकला होता. त्यामुळे केसचं स्वरूप समजलं होतं. त्या सूरजसाठी बेल मागत होत्या. त्यावर उद्या महाराष्ट्र सरकारच्या वकिलाचं म्हणणं ऐकून खंडपीठ निर्णय घेणार होतं. त्यापूर्वी न्यायमूर्ती पाटलांनी पीडितेचं म्हणणं ऐकायचं ठरवलं असणार, म्हणून त्यांनी केलेली अॅमिकस क्युरी होण्याची विनंती मान्य करून आपली एक हुशार तरुण वकील म्हणून हायकोर्ट वर्तुळात विकसित होणारी प्रतिमा अधिकच ठसठशीत करण्याची ही सुवर्णसंधी होती. पुन्हा प्रकरणाला पूरक ठरणाऱ्या सूरजच्या वकील गोखले मॅडम तर आहेतच; विकास क्षणाचाही विचार न करता म्हणाला, ‘‘येस मिलॉर्ड. इट विल बी माय प्लेजर टू बी अॅमिकस क्युरी.’’