

Russia Ukraine War
esakal
श्रीराम पवार- shriram1.pawar@gmail.com
युक्रेनचं युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपसाठी सर्वांत मोठं आव्हान आहे. अजूनही युक्रेनचा घास रशियाला घेता आला नाही, त्याचं प्रमुख कारण हा स्पष्ट पाठिंबा. यात युक्रेननं युद्ध जिंकण्यापेक्षा रशियाला कमकुवत करणं हा प्रमुख उद्देश होता. त्याचा व्यवहारातील अर्थ होता, युक्रेनला पराभूत होऊ द्यायचं नाही. दुसरीकडं रशियाला लवकरच हे कळून चुकलं की हे युद्ध सहजासहजी संपणारं नाही. दीर्घ युद्धात चिवटपणे लढत राहायचं, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची, हा रशियाच्या इतिहासाचा भाग आहे.
रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं त्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. युद्ध संपण्याची काही चिन्ह नाहीत. युक्रेन रशियाच्या अटींवर युद्ध संपवायला तयार नाही आणि रशिया आपली भूमिका सोडत नाही, यातून युद्धाचीही एक कोंडी तयार झाली आहे. त्यात सध्या तरी रशियाची बाजू काहीशी उजवी आहे आणि ट्रम्प यांचा हे युद्ध थांबवण्याचा उत्साह अजून संपलेला नाही. या युद्धानं मागच्या चार वर्षांत जागतिक रचनेत होत असलेल्या बदलांवर प्रभाव टाकला. युद्धविषयक पारंपरिक कल्पना बदलल्या. लाख लोकांचा बळी पडलेलं हे दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपच्या दारात चाललेलं सगळ्यात विनाशकारी युद्ध बनलं आहे. काही दिवसांत युक्रेनची राजधानी किव्हवर कब्जा करायचा, झेलेन्स्की यांचं पाश्चात्त्यांकडं झुकलेलं सरकार उलथवायचं आणि युक्रेनला पुन्हा एकदा रशियाच्या प्रभावाखाली आणायचं या हेतूनं सुरू झालेलं युद्ध पाचव्या वर्षात प्रवेश करताना रशियाला यातील काहीच साध्य झालेलं नाही, मात्र युक्रेनचा सुमारे २० टक्के भूभाग रशियाच्या ताब्यात आहे आणि युद्धबंदीच्या कोणत्याही तडजोडीत रशिया हा भाग सोडण्याची शक्यता नाही.