
हृदयनाथ मंगेशकर
kunteshreeram@gmail.com
कोण असेल हा ‘जिवलगा’ ज्याला मी अनाम, अनाकलनीय, अतर्क्य, गूढ म्हणतो, कोण असेल हा? तो कोमल तारसप्तकातला समेवरला जीवघेणा रिखब, त्या रिखबावर गाता, गाता, अचानक ‘जिवलगा’ हा शब्द मला मिळाला होता. मिळाला म्हणण्यापेक्षा तो शब्द स्फुरला होता. हे स्फुरण मला कुणी दिले होते? विचारांचा गोंधळ झाला, तो कोमल रिखब, नागाने फणा काढावा अशी ती सम, त्या आघातातून स्फुरलेला ‘जिवलगा.’ शांताबाई म्हणाल्या तितका सोपा नाही, माझा हा ध्यास. याचा शोध घ्यावाच लागेल. तोपर्यंत हे मन असेच अस्वस्थ, किंचित पिसाट राहू दे, मीच ही अस्वस्थता. हे पिसाटपण जपले पाहिजे, एकदा का मन स्वस्थ झाले, दिवसाची पुटं त्यावर चढली, की हा शोध लावणे, शोध घेणे, सारे संपेल, या ‘जिवलगा’साठी माझा जीव आसावला आहे, तो तसाच राहो.