

Saudi UAE Conflict
esakal
येमेन हा काही शतकं सर्वाधिक कॉफी उत्पादन आणि निर्यात करणारा देश तसंच मसाल्याच्या व्यापाराचं केंद्र होता. मात्र दशकापेक्षा अधिक काळ गृहयुद्धात भरडला गेलाय. आता येमेनच्या भूमीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात मोठा तणाव निर्माण झालाय. त्यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत. आपल्याच दोन मित्र देशांमध्ये युद्ध होऊ नये यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र अरबस्तानातल्या या दोन देशांमधल्या संबंधांना चांगलाच तडा गेलाय, हे नक्की.
संपलेल्या वर्षानं जगाला अनेक धक्के दिले. जागतिक व्यवस्था बदलण्याचे संकेत देणाऱ्या उलथापालथी झाल्या. न संपलेलं रशिया-युक्रेन युद्ध, इस्राईलचे गाझा पट्टीतील हल्ले, भारताचे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणारे ऑपरेशन सिंदूर हे थेट संघर्ष तर अमेरिकेच्या व्यापारयुद्धानं जगाला दिलेला ताण असं बरंच काही घडवलेल्या खरंतर बिघडवलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधात अगदी वर्ष सरता सरता अरब जगातील यार दोस्त म्हणून गणल्या जात असलेल्या सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीत (युएई) संघर्षाची ठिणगी पडली. हे सारं नव्या वर्षात जागतिक ताण, अस्थिरता मागील पानावरून पुढं चालत राहण्याची शक्यता दाखवणारं. सौदी आणि युएईमधील संघर्ष फारसा ताणला जाणार नाही, याची दक्षता दोन्ही देश आणि दोघांचा समान मित्र-मार्गदर्शक अमेरिकेन घेतली, मात्र सौदीनं येमेनमधील युएईच्या तळांवर केलेले हवाई हल्ले अरबस्तानातील संबंधात बिघाड दाखवतात.