

Drone Warfare Impact on Geopolitics
esakal
जतीन देसाई - jatindesai123@gmail.com
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये ८८ तास हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. आपली हवाई सरहद्द न ओलांडता भारताने पाकिस्तानात क्षेपणास्त्रं डागत लगेच आपलं वर्चस्व सिद्ध केलं. भारताने ऑपरेशन स्वतःच्या अटींवर संपवलं. आपलं वाढलेलं लष्करी सामर्थ्य आणि युद्धाचं बदलतं स्वरूप त्यातून अधोरेखित होतं.
‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष झालं. गेल्या वर्षी
७ मेच्या पहाटे ऑपरेशनची सुरुवात झाली. चौथ्या दिवशी म्हणजे १० मे रोजी भारताने युद्धबंदीची घोषणा केली. ८८ तास हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू होते. भारताने लगेच आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सायंकाळी ५ वाजता युद्धबंदीची जाहिरात केली. त्यांच्या पत्रकार परिषदेच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान सायंकाळी युद्धबंदी जाहीर करणार, असं म्हटलेलं. अण्वस्त्रे असलेल्या दोन देशांत युद्धबंदी घडवून आणून आपण लाखो लोकांचे जीव वाचवले असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलेला... तंत्रज्ञानाच्या काळात ही बातमी काही मिनिटांत जगभर पसरली. एक वर्षापूर्वी भारताने आपलं वर्चस्व सहज सिद्ध केलेलं. या पार्श्वभूमीवर भारताचा सामरिक आणि राजनैतिक-लष्करी धोरणाचा आढावा घेणं आवश्यक आहे.