
डॉ. आनंद ज. कुलकर्णी
शालेय गणित परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता त्याचा भौतिक अर्थ समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी गणिताचा अभ्यास धोपटमार्ग सोडून केला पाहिजे... गोगलगायींवरील अभ्यासाच्या निमित्ताने केलेले चिंतन.
मानवासहित कित्येक प्राण्यांच्या, कीटकांच्या व पक्षांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचा अभ्यास आजपर्यंत जगातील विविध देशांतील शास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचे गणितीय रूपांतर करून त्याचे कॉम्प्युटर कोडमधे म्हणजेच इंटेलिजन्ट अल्गोरिदम्स मधे रूपांतर केले आहे. असे अल्गोरिदम्स, विविध क्षेत्रांतील कित्येक जटील प्रश्नांचे व समस्यांचे उत्तर शोधतात. असाच एक दुर्लक्षित पण अत्यंत बुद्धिमान प्राणी म्हणजे गोगलगाय. मागील साधारण पाच वर्षे मी या प्राण्यावर अभ्यास करतो आहे.
त्याच्या अचाट बुद्धिमत्तेचा अभ्यास मी त्यांच्या झुंडींबरोबर कित्येक दिवस राहून, वर्गीकरण करून, तसेच इतर संशोधनांचे संदर्भ घेऊन केला आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचे गणिती रूपांतर व कॉम्प्युटर कोड बनवून ‘स्नेल अल्गोरिदम’ बनवले. त्याचा उपयोग यांत्रिकी अभियांत्रिकी (मॅकेनिकल इंजिनीरिंगमधील) अत्यंत जटिल समस्या सोडवण्यासाठी केला.