

LPG cylinder price hike
esakal
अरविंद रेणापूरकर- sarkarnama@esakal.com
पश्चिम आशियातील इराण-इस्राईल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. विशेषतः जगातील अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यामुळे भारतासह अनेक आयातदार देशांच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आयातदार देश आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा थेट परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर होत आहे. गेल्या काही दिवसांत देशातील विविध शहरांमध्ये, विशेषतः व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग सेवा आणि लहान खाद्यव्यवसाय या क्षेत्रांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पुरवठ्यातील अडथळ्यांचा सर्वाधिक फटका या उद्योगाला बसत आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भारताच्या ऊर्जा व्यवस्थेतील कमकुवत बाबी पुन्हा अधोरेखित केल्या आहेत. एलपीजीसारख्या अत्यावश्यक इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला जागतिक भू-राजकीय तणावाचा थेट फटका बसत आहे.