

Gender equality in marriage
esakal
ॲड. रमा सरोदे
पतींनी घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेणे ही काळाची गरज आहे. असे केल्याने ते काही उपकार करीत नाहीत, अशी टिप्पणी करीत सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बदलत्या सामाजिक मूल्यांची जाणीव अधोरेखित केली. न्यायालयाचे विधान महत्त्वाचे आहे. कारण ते सत्य स्पष्टपणे सांगते... पण ते प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर भारताने केवळ कायदा आणि रोजगारातील नव्हे; तर घरातील लिंगभेदही मिटवला पाहिजे. लिंगभेदातील अंतर आणि समतेच्या आधारे विवाहाची पुनर्बांधणी करण्याची गरज यानिमित्त व्यक्त होत आहे.
काही वर्षांपूर्वी माझ्याकडे इंटर्नशिप करणारी एक विद्यार्थिनी स्वतःची ओळख करून देताना अभिमानाने सांगत होती, की तिचे वडील घर सांभाळतात आणि तिची आई एक यशस्वी उद्योजिका आहे. हे ऐकून इतर विद्यार्थ्यांना धक्का बसला आणि त्यांना ते ‘असामान्य’ व कधीही न ऐकलेले वाटले. ती पुढे म्हणाली, की माझ्या वडिलांना घरकाम करण्यात आनंद वाटतो...