

Folk Culture Tatika Song
esakal
संजीव भागवत - sanjeev.bhagwat@esakal.com
‘अरे सेनापती, या उत्तर दिशेतून शत्रूप्रवेश झाला तर काय विलाज करशील रे!’... सेनापती उत्तर देतो, ‘सरकार, या उत्तर दिशेतून शत्रूप्रवेश होऊन आपणास काही करणार नाही. यासाठी तीरांची कैची, केवळ बाणांचा कोट केला आहे. या ठिकाणी वायूदेखील प्रवेश होणार नाही. त्यामुळे शत्रू काही करणार नाही महाराज!’
महाराणी ताटिका सेनापतीला दुसरा एक प्रश्न विचारते, ‘अरे सेनापती, आपली सेना कोणकोणत्या विद्येत तयार आहे रे?’ त्यावर सेनापती उत्तरतो, ‘आपली सेना अस्त्रात तयार आहे, शस्त्रात तयार आहे, वायूचक्रात तयार आहे, अग्निचक्रात तयार आहे... जशी आकाशात विद्युल्लता चमकते, याचप्रमाणे आपली सेना चमकत आहे महाराज!’
हा संवाद कोणत्या पौराणिक वा पारंपरिक नाटकातील नव्हे; तर तो आहे, सांगली जिल्ह्यातील मिरजजवळ असलेल्या बेडग या गावातील मरगाई यात्रेत काढल्या जाणाऱ्या ताटिका सोंगातील. ताडाच्या वनाची राणी म्हणून जिची ओळख आहे, ती महाराणी ताटिका (त्राटिका किंवा ताडका) हिच्या राज्यकारभाराची आठवण करून देणारे आणि तिचा गौरव करणारे सोंग असते. तिचा आपले सेनापती, प्रधान आदींसोबत झालेला हा संवाद सोंगातून मांडला जातो. हा संवाद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये ताटिकेची प्राचीन ओळख आणि तिचा वारसा अधोरेखित करतो. बेडग गावाने ताटिकेचा हा वारसा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून शेकडो शतकांपासून जपला आहे.