

Indigo Airlines Flight Disruptions
esakal
५ डिसेंबर २०२५ रोजी भारतातील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. इंडिगोने देशभरातील मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली आणि हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले. अनेकांना हॉटेल्स, वाहतूक आणि इतर तातडीच्या खर्चांसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागली. हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे उड्डाणे रद्द होणे सामान्य असते, परंतु यावेळी कारण वेगळे होते, पायलटांच्या कामकाजाच्या वेळेचे नियोजनच कोलमडले होते.
या गोंधळात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अचानक घोषणा केली की, फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) म्हणजेच पायलटांच्या कामकाज आणि विश्रांती वेळेचे नियम तात्पुरते स्थगित केले जात आहेत, ‘ऑपरेशन्स स्थिर करण्यासाठी.’ त्याआधी DGCA ने पायलटांनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते. या दोन्ही निर्णयांनी तज्ज्ञांमध्ये चिंता निर्माण केली. प्रवासी सुरक्षेपेक्षा व्यावसायिक सोयीला प्राधान्य दिले जात आहे का?