वैष्णवी वैद्य मराठे
महाराष्ट्राच्या सण-उत्सवांच्या समृद्ध परंपरेत मानानं मिरवणारा सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे, तर सौंदर्य आणि कलात्मकतेचाही एक देखणा सोहळा असतो. घरोघरी विराजमान झालेला गणपती बाप्पा आणि गौरी... त्या दहा दिवसांत तर नवचैतन्याचा झराच वाहत असतो. कितीतरी महिने आधीपासून गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. ही तयारी करतानासुद्धा खूप मौज येते. गणपतीसाठी मखर, आरास, सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठ सजलेली असते. त्यातच गणेश मूर्तीची शोभा वाढवणारे दागिने बाजारपेठेचा आकर्षणबिंदू ठरतात.