esakal | दीर्घायुष्यामागचे रहस्य...
sakal

बोलून बातमी शोधा

The worlds oldest people and their secrets to a long life}

दीर्घायुष्यामागचे रहस्य...

sakal_logo
By
राजेंद्र घोरपडे

नव्या पिढीमध्ये दीर्घायुष्य लाभणे आता मोठ्या भाग्याचे आहे. सर्वसाधारण 70 ते 90 वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जात आहे. शंभरी पार करणारे क्वचितच पाहायला मिळत आहेत; पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे शंभरी पार करणाऱ्यांची संख्या तुलनेत जास्त आहे. त्या ठिकाणांचे असे काय वैशिष्ट्य आहे याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. दीर्घायुष्य लाभण्यामागचे रहस्य काय आहे? संशोधकांनी कोणत्या गोष्टींचा उलघडा केला आहे? या संदर्भातील हा लेख....

अझरबैजान पूर्वी सोविएत संघामधील एक राष्ट्र होते. आता युरोप आणि आशिया या दोन खंडांच्या सीमांवरील हा देश आहे. या देशातील इराणच्या सीमेजवळील लेरिक गावामध्ये तसेच या परिसरात मनुष्य सरासरीपेक्षा जास्त वर्षे जगतो. या संदर्भात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे. काय आहे या मागचे रहस्य? या शहरात असे काय वैशिष्ट्य आहे? मनुष्याच्या जगण्याला तेथील वातावरण, माती या सर्व गोष्टी तितक्याच कारणीभूत असतात हे जरी खरे असले तरी दीर्घायुष्य लाभावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. अशा या वैशिष्ट्यामुळे हे शहर आता पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. जगभरातून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हे सुद्धा विचारात घेण्यासारखे आहे.

नोंदीतील दीर्घायुषी व्यक्ती...

सोविएतच्या माहितीनुसार शिराली मुस्लिमोव ही महिला 2 सप्टेंबर 1973 मध्ये 168 वर्षांची असताना तिचे निधन झाले. तिचा जन्म 26 मार्च 1805 रोजी झाला होता. सर्वसाधारण 90 वर्षांचा मनुष्य दीर्घायुषी समजला जातो; पण अझरबैजानमध्ये दीर्घायुष्य लाभलेल्या अनेक व्यक्ती पाहायला मिळतात. इराणच्या सीमेवरील बारझाव्ह या गावात शिरालीचा मेंढपाळ कुटुंबात जन्म झाला होता. तिचा आहार आयुष्यभर सुसंगत राहिला. कोकरूच्या दुधासह दही, चीज, तांदूळ आणि उकडलेले मांस हा तिचा आहार होता. तिची मुलगी 136 वर्षे जगली, तर तिचे भाऊ व कुटुंबीय शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगले, असा दावा शिराली हिने रशियन पत्रकाराने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.

अझरबैजानमधील तज्ज्ञांची दीर्घायुषी जीवनाबद्दलची मते

1977 मध्ये अमेरिका आणि तत्कालिन सोविएत रशिया यांनी संयुक्तपणे अझरबैजानच्या दीर्घायुषी जीवनाबद्दल संशोधन केले. अकादमी ऑफ सायन्सेसच्या फिजिऑलॉजी लॅबोरेटरी आणि लाँगेटिव्हिटी विभागाच्यावतीने यावर अभ्यास केला. वीरा रुबिन यांनी याचे नेतृत्व केले; पण 1980 मध्ये रुबिन यांचे निधन झाल्याने हे संशोधन रखडले गेले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर संशोधन होऊ शकले नाही. काही कालावधीनंतर अझरबैजान येथीलच तज्ज्ञांनी यावर संशोधन केले.

दीर्घायुषीबद्दल संशोधकांची मते...

1. अझरबैजानच्या संशोधकांनी अनुवंशिकता हे दीर्घायुषी जीवनाचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले आहे. वारसाहक्काने हा ठेवा मिळत असल्याचा विश्वास येथील जनतेत आहे. अनेक दीर्घायुषी कुटुंबांचा अभ्यास केल्यानंतर हे मत नोंदविण्यात आले आहे.

2. दीर्घायुषी जीवनाबद्दल पर्यावरणसुद्धा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. योग्य आहार व उत्तम वातावरणात उत्तम जमिनीत पिकवलेले अन्न हे सुद्धा दीर्घायुषी जीवनाचे रहस्य आहे.

3. पारंपरिक आनंदी सामाजिक वातावरण आणि पिढीजात यांच्यामध्ये असणारा दुवा यामुळे जीवनात ताणतणाव कमी राहतो. अझरबैजानमध्ये वृद्ध लोकांचा अत्यंत आदर केला जातो आणि त्यांना कुटुंब, समाजात उच्च स्थान दिले जाते. वृद्धांना कधीही निरुपयोगी किंवा अनावश्यक असे समजले जात नाही किंवा त्यांना वाऱ्यावर सोडूनही दिले जात नाही. त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जाते. हे सुद्धा दीर्घायुषी ठरण्यामागचे रहस्य आहे.

4. अझरबैजानमध्ये डोंगर-पर्वतांच्या पायथ्याशी राहणारे दीर्घायुषी असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. समुद्रसपाटीपासून 500ते 800 मीटर उंचीवर राहणारे दीर्घायुषी असल्याचे आढळले आहे. तसेच बाहेरून स्थलांतरित झालेले नागरिक तुलनेत कमी दीर्घायुषी असल्याचेही आढळले आहे.

5. दीर्घायुषी व्यक्तींच्या आहारात दही आणि लसणाचा समावेश असल्याचे पाहायला मिळते. थंडीच्या दिवसातच फक्त मांसाहार, तर उन्हाळ्यात हिरव्या भाजीपाल्याचा आहारात समावेश असतो; मात्र लोणचेयुक्त पदार्थ, गोड भाजलेले पदार्थ आणि चहा हे आहारात क्वचितच पाहायला मिळतात. पांढऱ्या तुतीपासून तयार केलेले बहमाज आहारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बहमाजमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो अॅसिड असतात. बहमाजमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते. वनौषधींचा वापरही यामध्ये महत्त्वपूर्ण समजला जातो. मुख्यतः या व्यक्तींमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार नसल्याचेही पाहायला मिळते.

6. ताणतणावमुक्त जीवनशैली दीर्घायुषी होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेली पाहायला मिळाली. मुख्यतः या व्यक्ती आशावादी असतात. त्यांची लग्ने वेळाने होतात, तर उतारत्या वयात पत्नीच्या निधनानंतर पुन्हा विवाहाची पद्धत येथे आहे.

7. अझरबैजानचे शास्त्रज्ञ यावर अभ्यास सुरू ठेवण्यासाठी इच्छुक आहेत. तसेच भविष्यात आंतरराष्ट्रीय गटांसह संयुक्त संशोधन करण्यासही उत्सुक आहेत. कारण दीर्घायुष्याचा अभ्यास हा अनेक शास्त्रीय-जीवशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञआणि लोकशास्त्रज्ञांच्या योगदानासाठी महत्त्वपूर्ण आहे. यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन होण्याची गरज आहे.

ब्लू झोन...

जगभरात दीर्घायुषी भागाचा सर्व्हे विविध संशोधकांच्या गटांमार्फत करण्यात आला आहे. या संदर्भात काही संशोधन प्रसिद्धही झाले आहे. सरासरीपेक्षा जास्त जीवन जगणारी माणसे आढळणाऱ्या भागांचा सर्व्हे संशोधकांनी केला. यातील पाच ठिकाणे निवडून त्यांना ‘ब्लू झोन’ असे नाव देण्यात आले. या संदर्भात 2005 मध्ये डॅन ब्युटनर यांची नॅशनल जिओग्राफिक मॅगेझिनमध्ये दीर्घायुषी जीवनाचे रहस्य अशी कव्हर स्टोरी प्रसिद्ध झाली होती. ओकीनावा (जपान), सारदिनी (इटली), निकोया (कोस्टल रिका), इकारिअ (ग्रीस) आणि लोमा लिंडा (कॅलिफोर्निया) अशी ही पाच ठिकाणे आहेत.

या पाच ठिकाणी आढळणाऱ्या दीर्घायुषी व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. दीर्घायुषी जीवनाबद्दलची काही गुपिते यातून स्पष्ट झाली, ती अशी..

1. या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण फारच कमी आढळले.
2. सर्वाधिक लोक शाकाहारी असल्याचे निदर्शनास आले.
3. शारीरिक हालचाल होईल अशा कामात लोक स्वतःला गुंतवून घेतात. उतार वयातही ते कामे करत राहतात.
4. सर्व वयोगटांतील व्यक्तींचा सामाजिक कार्यात सहभाग असल्याचे आढळते. समाजात एकत्रित कार्यावर भर असल्याचेही आढळले. एकंदरीत ताणतणावमुक्त जीवनशैलीवर या व्यक्तींचा भर असतो.
5.आहारात नियमितपणे कडधान्यांचा समावेश या व्यक्ती करतात.

दीर्घायुषी व्यक्तींच्या मते...

अटलांटा जर्नलमध्ये दीर्घायुषी जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील काही गुपिते मांडण्यात आली आहेत. काही संशोधकांनी त्यांची जीवन पद्धती, अनुवंशिकता आणि सामाजिक गतिशीलता यांचा अभ्यास केला आहे. तसेच काहींनी या व्यक्तींशी चर्चा करून मते नोंदविली आहेत.

1905 मध्ये जपानमध्ये जन्मलेल्या मसाझो नॉनका यांची दीर्घायुषी म्हणून गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. उतार वयातही ते वृत्तपत्र वाचतात आणि स्वतःचा आहार ते स्वतः घेतात. हॉट स्पिंग्जमध्ये नियमित भिजणे आणि सुमो कुस्ती पाहणे हा त्यांचा छंद आहे. हेच त्यांच्या दीर्घायुषी जीवनाचे गुपित असल्याचे ते सांगतात.

फ्रान्सची जिन्नी लुईस कॅलमेंट यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 1997 मध्ये 122 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना वयाच्या 120 व्या वर्षी दीर्घायुषी आयुष्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, त्यांना चॉकलेट खूप आवडतात आणि दर आठवड्याला सुमारे एक किलोग्रॅम चॉकलेट त्या खातात. हेच त्यांच्या दीर्घायुषी आयुष्याचे गुपित आहे.

जपानचे जिरोमोन किमुरा हे 116 वर्षे जगले. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले. ते टपाल कार्यालयात कामाला होते. वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते पन्नास वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगले. त्यांच्या मते कमी व गरजेपुरतेच खाणे हे त्यांच्या दीर्घायुषी होण्यामागचे मुख्य कारण आहे. ‘दीर्घायुषी होण्यासाठी घ्या गरजेपुरतेच हलके जेवण’ हे त्यांचे बोधवाक्य होते. याचे काही संशोधकांनी समर्थनही केले आहे.

आहारतज्ज्ञ आणि संशोधकांच्या मते दररोज 30 टक्के कॅलरीज घेतल्यास पेशींना हळूहळू बरे करण्याच्या शारीरिक प्रक्रियेत लक्षणीय गती प्राप्त होऊ शकते. त्यामुळे मेंदू आणि शरीरास रोगापासून मुक्ती मिळते. संशोधकांनी या संदर्भात उंदरावर प्रयोग केले. उष्मांक प्रतिबंधात्मक आहार मेंदूच्या आयुष्य वाढीस मदत करतो, असे या संशोधनात आढळले आहे.

जमैकामधील ब्राऊनमध्ये राहणाऱ्या व्हायलेट मॉस या 117 वर्षे जगल्या. जागतिक रेकॉर्डमध्ये नोंदीवेळी त्यांना त्यांच्या दीर्घायुषी जीवनाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, जेवणामध्ये डुकराचे आणि कोंबडीचे मांस त्यांनी वर्ज्य केले होते. हेच त्यांच्या दीर्घायुषी जीवनाचे रहस्य आहे.