

Year In Review 2025
esakal
बघता बघता २०२५ हे वर्ष सरत आले आहे. विविध घडामोडी, बऱ्या-वाईट घटनांमुळे हे वर्ष बरेच गाजले. प्रयागराज येथे झालेला महाकुंभमेळा, महिला क्रिकेट संघाने जिंकलेला विश्वचषक, पाकिस्तानविरोधात भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, सोशल मीडियावर सर्वाधिक गाजलेले विविध फोटोविषयक ट्रेंड्स गुगलवर चर्चेचे विषय ठरले. वर्षभरातील विविध घडामोडी, घटना आणि ट्रेंड्सचा ए टू झेड आढावा.
A - अहान पांडे आणि अनीत पड्डा : वर्षभरात सर्वाधिक चर्चा झालेल्या ‘सैयारा’ चित्रपट मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक ट्रेंडिंगमध्ये होता. या चित्रपटातील अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या अभिनयाचीही बरीच चर्चा झाली. या चित्रपटाचे शीर्षक गीतही बरेच गाजले.
B - ब्रायन जॉनसन : निखिल कामत यांच्या पॉडकास्टवरील जॉनसन यांची मुलाखत वर्षभरातील पॉडकास्ट सर्चमध्ये आघाडीवर होती. या मुलाखतीवेळी स्टुडिओतील प्रदूषणाची पातळी प्रचंड असल्याचे कारण देत, त्यांनी अर्ध्यातून मुलाखत सोडली होती. त्यामुळे हवा प्रदूषणाचा मुद्दाही गुगलवर चर्चेत होता.
C - सीझफायर अर्थात युद्धबंदी : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविरामाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी म्हणजे काय, याबाबत गुगलवर बराच शोध घेण्यात आला. याशिवाय म्हणजे काय विभागात मॉक ड्रिल, स्टॅम्पेड, पूकी आदी विषयही शोधण्यात आले.
D - धर्मेंद्र : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला. मागील ५० वर्षे चित्रपटसृष्टी गाजवणारे धर्मेंद्र यांच्याविषयी अनेकांनी गुगलवर माहिती घेतली.