
Bollywood golden era music
esakal
आज इतक्या वर्षांनंतर आपण जेव्हा आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांची गाणी ऐकतो-पाहतो तेव्हा काही बाबी अगदी स्पष्ट जाणवतात. साठ आणि सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात आशाताईंचा स्वर आरडींनी प्रमुख नायिकांसाठी अभावानेच वापरला. पण, आशाताईंनी याच नकारात्मक गोष्टीत मोठी बाजी मारली. क्लब साँग असो किंवा कॅबरे, आपल्या मादक स्वराचा सर्वोत्कृष्ट वापर करत त्यांनी हेलन, बिंदू यांच्यावर चित्रित गाणी लोकप्रिय केली. आशाताईंच्या स्वराचा वापर यापूर्वी कुणी अशा रीतीने केला नव्हता. नंतर मात्र जॅझ, रॉक, पॉप, गझल, कॅबरे, गझल, इंडियन क्लासिकल... त्यांच्या कंठाला कुठलाच स्वर वर्ज्य नव्हता. ऐंशीच्या दशकात मात्र पंचमदांनी आशाताईंना मुख्य प्रवाहात आणून उत्तमोत्तम गाणी दिली.